पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्थशास्त्रातलं फारसं कळत नाही- राहुल गांधी

 बेरोजगारीसंदर्भात मोदी तोंडातून चकार शब्दही काढत नाहीत.

Updated: Jan 28, 2020, 03:36 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्थशास्त्रातलं फारसं कळत नाही- राहुल गांधी title=

जयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्थशास्त्राची फारशी जाण नाही, अशी खोचक टिप्पणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते मंगळवारी जयपूर येथील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारचे विकासदराचे आकडे खोटे असल्याचा दावा केला. जुन्या मूल्यमापन पद्धतीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) अवघा २.५ टक्के असल्याचे राहुल यांनी म्हटले. 

नरेंद्र मोदी यांनी देशात दोन कोटी रोजगारांच्या निर्मितीचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्यावर्षी तब्बल १ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. सध्याच्या घडीला बेरोजगारी ही देशातील सर्वात मोठी समस्या असतानाही पंतप्रधान मोदी जातील तिथे केवळ नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA)आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीबद्दल (NRC) बोलतात. बेरोजगारीसंदर्भात ते तोंडातून चकार शब्दही काढत नाहीत, अशी टीका यावेळी राहुल यांनी केली. 

नोटबंदी ही घोडचूक होती हे एखादा लहान मुलगाही सांगेल. यापूर्वी भारत विकासदराच्या बाबतीत चीनशी स्पर्धा करू पाहत होता. मात्र, आता चीनने आपल्याला बरेच मागे टाकले आहे. चीनशी स्पर्धा करण्याचे सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते भारतीय तरुणाईमध्ये आहे, ही बाब संपूर्ण जगाला ठाऊक आहे.  भारत हा बंधुभाव, प्रेम आणि एकतेसाठी ओळखला जात होता. मात्र, नरेंद्र मोदी यांनी जगभरात देशाची ही प्रतिमा मलिन केल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.