Loksabha Election 2024: उत्तर प्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदी लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. 14 मे रोजी पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजपकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. एनडीएचे अनेक नेतेदेखील उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी पंतप्रधान अस्सी घाटावर जाणार आहेत. तर, सकाळी 10 वाजता काल भैरवाच्या दर्शनासाठीही जाणार आहेत. त्यानंतर जवळपास 11 वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज भरण्याआधी एनडीए नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर 11.40 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पंतप्रधान मोदी झारखंडसाठी रवाना होणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीसाठी 4 प्रस्ताव जवळपास निश्चित झाले आहेत. त्यात आचार्य गणेशवर शास्त्री, सोमा घोष सरोज चुडामणी, माझी समाजातील एक प्रस्तावक आणि एका महिलेचा समावेश असण्याची शक्यता आहे.
13 आणि 14 मे रोजी असा असेल पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम
पंतप्रधान मोदी सोमवारी सकाळी 10 वाजता पटण्यातील गुरुद्वारा येथे जाणार आहेत. त्यानंतर प्रचाराला सुरुवात करणार आहेत.
सकाळी 10.30 वाजता हाजीपुरमध्ये रॅली, 12 वाजता मुजफ्फरपुर,2.30 वाजता सारण आणि संध्याकाळी 5 वाजता वाराणसीमध्ये रोड शो
मंगळवारी 14 मे रोजी सकाळी अस्सी घाटावर जाणार
सकाळी 10.15 वाजता काल भैरव मंदिरात दर्शनासाठी जाणार
अर्ज दाखल करण्यापूर्वी 10.45 वाजता एनडीएच्या नेत्यांसोबत बैठक
सकाळी 11.40 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार
दुपारी 12.15 वाजता पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक
त्यानंतर पंतप्रधान मोदी झारखंडसाठी रवाना होणार
दुपारी 3.30 वाजता कोडरमा- गिरिडीहमध्ये सभा घेणार
वाराणसीतून दोनदा पंतप्रधान मोदी निवडून आले आहेत. लोकसभेसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी काशीच्या रस्त्यांवर रोड शो करतात. त्यामुळं यंदाही असाच भव्य दिव्य रोड शो करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, वाराणसी लोकसभा मतदारसंघात अंतिम टप्प्यात म्हणजेच 1 जून रोजी मतदार होत आहेत. त्यासाठी 7 मे पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठीच पंतप्रधान मोदीदेखील त्यांच्या दोन दिवशीय दौऱ्यावर आहेत. 13 व 14 मे रोजी वाराणसीमध्ये असणार आहेत. 13 मे रोजी पंतप्रधान मोदी वाराणसीमध्ये रोड शो करणार आहेत. तर, 14 मेच्या सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.