नवी दिल्ली : केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना भरघोस आश्वासनं दिली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारचा कृषी विभाग आणि निती आयोगानं तयारी केली आहे. सरकार शेतकऱ्यांना काय देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दुष्काळ, नापिकीशी लढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी येत्या काही दिवसांत सुखवार्ता मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी येत्या काही अच्छे दिन येण्याचे स्पष्ट संकेत केंद्र सरकारनं दिले आहेत.
मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक घोषणा करण्याची शक्यता आहे. २४ फेब्रुवारीला भाजपाच्या राष्ट्रीय किसान मोर्चाचं उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूरमध्ये अधिवेशन आहे. या अधिवेशनात मोदी मोठी घोषणा करणार असं भाजपातील सूत्रांनी सांगितलय. सरकार शेतमालाच्या हमीभावात मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. किंवा शेतकऱ्याला लागवडीसाठी वार्षिक अनुदान जाहीर केलं जाण्याची चर्चा आहे. तसंच बिनव्याजी पीक कर्जाचीही घोषणा होऊ शकते. यासाठी केंद्राचा कृषी विभाग आणि निती आयोग कामाला लागलंय.
पंतप्रधान मोदींनीही देशातल्या शेतकऱ्याच्या पिकाला पाणी मिळावं यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं सांगितलं आहे. सरकार सुखवार्ता देणार म्हटल्यावर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्यात. आता सरकार नेमकी काय घोषणा करणार आणि पदरात नेमकं काय पडणार, याकडे शेतकरी डोळे लावून बसलाय.