5 new Vande Bharat Trains: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते आज (27 जून) एकाच वेळी 5 वंदे भारत ट्रेन्सला (Vande Bharat Train) हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. पंतप्रधान मोदी प्रत्यक्षात भोपाळ रेल्वे स्थानकामधून भोपाळ ते इंदूर आणि भोपाळ ते जबलपुर या 2 ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवती तर अन्य 3 ट्रेन्सला ते डिजीटल माध्यमातून हिरवा झेंडा दाखवणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एकाच वेळी 5 वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. आज उद्घाटन केल्या जाणाऱ्या 5 'वंदे भारत ट्रेन्स'पैकी एक ट्रेन महाराष्ट्राला मिळणार आहे. महाराष्ट्रातील ही चौथी वंदे भारत ट्रेन ठरेल. सध्या 2 पूर्णपणे महाराष्ट्रातील 2 शहरांना कनेक्ट करणाऱ्या तर एक महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावतात.
सध्या भारतामध्ये 18 वंदे भारत ट्रेन्स धावतात. भारतीय रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज ज्या 5 ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे त्यामध्ये भोपाळ ते इंदूर, भोपाळ ते जबलपुर, पाटणा ते रांची, बेंगळुरु ते हुबळी आणि गोवा ते मुंबई या 5 मार्गांचा समावेश आहे. 3 राज्यांमध्ये पहिल्यांदाच वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. गोवा, झारखंड आणि बिहारमध्ये आतापर्यंत एकही वंदे भारत ट्रेन नव्हती. या राज्यांनाही आता वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. ईशान्य भारतात केवळ आसाममध्ये वंदे भारत ट्रेन धावते. ईशान्य भारतातील रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचं काम सुरु असून हे काम पूर्ण झाल्यानंतर या राज्यातही वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील असं सांगितलं जात आहे.
आजपासून सुरु होणारी मुंबई-गोवा वंदे भारत ही महाराष्ट्रातील चौथी अशी ट्रेन ठरणार आहे. यापूर्वी 2 पूर्णपणे राज्यातील शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत सुरु झाल्या आहेत. तर एक वंदे भारत ट्रेन बिलासपूरवरुन महाराष्ट्रातील नागपूरपर्यंत धावते. मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचं उदघाटन 3 जून रोजी होणार होतं. मात्र ओडिशामधील ट्रेन अपघातानंतर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
> देशातली सर्वात पहिली वंदे भारत ट्रेन 2019 मध्ये धावली. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही ट्रेन धावली.
> दुसरी वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वैष्णो देवी कटरा मार्गावर चालवण्यात आली.
> तिसरी वंदे भारत ट्रेन मुंबई ते गांधीनगर मार्गावर चालवली गेली.
> चौथी ट्रेन नवी दिल्ली ते हिमाचलमधील अंब अंदौरा मार्गावर धावली.
> पाचवी वंदे भारत ट्रेन चेन्नई ते मैसूरदरम्यान धावली.
>सहावी वंदे भारत नागपूर ते बिलासपूरदरम्यान धावली.
> सातवी वंदे भारत ट्रेन हावडा ते न्यू जलपायगुडीदरम्यान धावली.
> आठव्या 'वंदे भारत'ने सिंकदाराबाद ते विशाखापट्टनम शहरं जोडण्यात आली.
> पूर्णपणे महाराष्ट्रातून धावाणारी वंदे भारतची 9 वी ट्रेन मुंबई सोलापूर मार्गावर धावली.
> तर 10 वी ट्रेन मुंबई ते शिर्डी मार्गावर धावाली.
> 11 वी वंदे भारत ट्रेन रानी कमलापति स्टेशन (भोपाळ) ते निजामुद्दीनदरम्यान सुरु करण्यात आली.
> 12 वी सिकंदराबाद ते तिरुपतीदरम्यान धावली.
> तसेच 13 व्या वंदे भारत ट्रेनचा मार्ग चेन्नई ते कोइम्बतूर असा होता.
> 14 वी वंदे भारत दिल्ली ते अझमेर दरम्यान धावली.
> 15 वी वंदे भारत तिरुअंतपुरम ते कासरगोडदरम्यान धावली.
> 16 वी वंदे भारत भुवनेश्वर ते हावडादरम्यान सुरु केली गेली.
> 17 वी वंदे भारत दिल्ली ते देहरादूनदरम्यान सुरु झाली.
> नुकतीच सुरु झालेली 18 वी वंदे भारत ट्रेन जलपायगुडी ते गुवाहाटीदरम्यान धावते.