'सध्या आपण एकजुटीने राहिले पाहिजे, पण मोदींना सर्वांना सोबत घ्यायचेच नाही'

आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated: Jun 19, 2020, 03:40 PM IST
'सध्या आपण एकजुटीने राहिले पाहिजे, पण मोदींना सर्वांना सोबत घ्यायचेच नाही' title=

नवी दिल्ली: गलवान खोऱ्यातील भारत आणि चिनी सैनिकांमधील रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला १७ पक्ष उपस्थित राहणार आहेत. तर तीन राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. यामुळे आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांचा पारा चांगलाच चढला आहे. सध्याच्या काळात आपण सर्वांनी एकजुटीने पुढे जाण्याची गरज आहे. परंतु, मोदी सरकार केवळ 'सबका साथ, सबका विकास', अशी घोषणाच देते. प्रत्यक्षात त्यांना सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचेच नाही, अशी टीका 'आप'चे नेते संजय सिंह यांनी केली. 

'आप'सह राष्ट्रीय जनता दल आणि टीडीपी या पक्षांनाही बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही. यावरुन नवा वाद रंगला आहे. मात्र, मोदी सरकारकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या बैठकीसाठी पाच किंवा त्याहून अधिक खासदार असलेल्या राजकीय पक्षांनाच आमंत्रित करण्यात आले आहे. परंतु या तिन्ही पक्षांचे खासदार संसदेत ५ पेक्षा कमी आहेत. त्यामुळे या पक्षांना बैठकीचे निमंत्रण मिळालेले नाही.

दरम्यान, आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यामुळे देशातील वातावरण प्रक्षुब्ध आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हेदेखील मोदी सरकारवर सातत्याने हल्ले चढवत आहेत. चीनचा हल्ला हा पूर्वनियोजित होता, हे आता स्पष्ट झाले आहे. मग मोदी सरकारने काहीच का केले नाही, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता.