नवी दिल्ली : एक हजार महात्मा गांधी आणि लाख मोदी रस्त्यांवर उतरले तरी देश स्वच्छ करु शकणार नाही. मात्र सव्वाशे कोटी देशवासीय रस्त्यावर उतरले तर देश नक्कीच स्वच्छ होईल असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय.
स्वच्छ भारत अभियानाच्या तिस-या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
कोणतंही काम छोटं नसतं, पण हातात झाडू घ्यायला कुणी तयार होत नाही अशा शब्दांत स्वच्छ भारत अभियानावर टीका करणा-यांना मोदींनी सुनावलं आहे. या अभियानामुळे देशात सकारात्मक वातावरण तयार झाल्याचं मोदी म्हणालेत. स्वच्छतेसाठी वैचारिक आंदोलनाची गरज असल्याचंही नरेंद्र मोदींनी म्हटलंय.
स्वच्छ भारताचं स्वप्न सव्वाशे कोटी देशवासीय एकत्र आले तर नक्कीच साकार होईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.