मुंबई: ट्विटरने मिशन स्वच्छता अभियान सुरु केलंय. या अंतर्गत ट्विटरकडून बनावट अकाऊंट बंद करण्याची मोहीम सुरु करण्यात आलीय. ट्विटरच्या या स्वच्छता अभियानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या दोन लाखांनी घटलीय. मोदींच्या ४ कोटी ३३ लाख फॉलोअर्समध्ये घट होऊन ती संख्या आता ४ कोटी ३१ लाख इतकी झालीय.
ट्विटरच्या मोहिमेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येतही घट झालीय. ट्रम्प यांच्या ४ कोटी ८० लाख फॉलोअरपैकी ३७ टक्के बनावट असल्याचं सांगण्यात येतंय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फॉलोअरची संख्या १२ हजार ९७४ ने कमी झालीय. शाहरुख खान व सलमान खान या दोन अभिनेत्यांचे ट्विटरवरील फॉलोअरही प्रत्येकी सुमारे तीन लाखांनी कमी झाल्याचे समजते.
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही याचा फटका बसला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांचेही फॉलोअर्सही अचानकपणे कमी झाले आहेत. ट्विटरवरील अनेक निष्क्रिय आणि लॉक्ड अकाऊंट्सला ट्विटरने बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचे 4,24,000 तब्बल फॉलोअर्स कमी झालेत. तर शाहरुख खानचे 3,62,141 आणि सलमान खानचे 3,40,884 फॉलोअर्स अचानक कमी झालेत. ट्विटरच्या या सफाई अभियानामुळे आमीर खान, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदूकोणचे फॉलोअर्सही कमी झालेत.