हैद्राबाद : जागतिक उद्योजकता शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प भारत दौ-यावर आली होती. भेटीची आठवण म्हणून इवांका ट्रम्पला सुंदर भेटवस्तू देण्यात आली.
ही भेटवस्तू म्हणजे एक सुंदर लाकडी पेटी आहे. ही पेटी सॅडली हस्तकलेचा उत्तम नमुना आहे. सॅडली हस्तकला मूळची गुजरातमधल्या सूरतची आहे. तिथे सॅडली हस्तकलेपासून वस्तू तयार केल्या जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अन्य देशातल्या मोठया नेत्यांना भेटतात तेव्हा ते आवर्जून भारतीय संस्कृती, परंपरेशी संबंधित खास वस्तू भेट म्हणून देतात. मोदींनी इवांका ट्रम्प हिला देखील अशीच भेट दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली तेव्हा सुद्धा अशाच प्रकारचा एक बॉक्स भेट दिला होता. पंजाबच्या होशियारपूरमध्ये हा बॉक्स बनवण्यात आला होता. बारीक नक्षीकाम केलेला हा बॉक्स तयार करण्यासाठी सात महिने लागले होते.