बाळकृष्णाच्या मूर्तीला घेऊन महिला पोहोचली रुग्णालयात, डॉक्टरांना म्हणाली, 'इलाज करा'

Loard Krishna idol in hospital: डॉक्टरांनी महिलेला आरामात बसवले आणि मूर्ती हातात घेतली आणि देव पूर्णपणे ठिक असल्याचे समजावून सांगितले. देवाला उपचाराची आवश्यकता नाही. डॉक्टरांच्या तोंडून हे ऐकल्यानंतर महिलेला हायसे वाटले. त्यानंतर ती महिला आपल्या पतीसोबत मूर्ती घेऊन घरी परतली.

Pravin Dabholkar | Updated: Jul 21, 2023, 01:40 PM IST
बाळकृष्णाच्या मूर्तीला घेऊन महिला पोहोचली रुग्णालयात, डॉक्टरांना म्हणाली, 'इलाज करा' title=

Loard Krishna idol in hospital: भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धा आणि भक्तीच्या अगणित कहाण्या आहेत. देवावरील श्रद्धेसाठी भक्त काहीही करायला तयार असतात. कोणी महिनाभर अनवाणी चालून उपवास करतो, तर कोणी लाखोंची संपत्ती देवाला दान करतो. देवाची आपल्यावर कृपा राहावी अशी यामागची धारणा असते. यातून मग अनेक घटना समोर येतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील दतिया जिल्हा रुग्णालयात पहायला मिळाली. येथील एक महिला भगवान श्रीकृष्णाची मुर्ती घेऊन थेट रुग्णालयात पोहोचली. भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीवर उपचार करा, असे डॉक्टरांना सांगू लागली. हा प्रकार पाहून डॉक्टरदेखील चक्रावले आहेत. 

दतिया जिल्हा रुग्णालयात श्रीकृष्णाची मूर्ती मांडीवर घेऊन एक महिला डॉक्टरांकडे पोहोचली. मूर्तीवर उपचार करा, असे ती वारंवार डॉक्टरांना सांगू लागली. हे पाहून डॉक्टरही चक्रावून गेले. 

महिलेची मानसिक स्थिती त्यांना बरी वाटत होती. ती बघण्यात आणि बोलण्यात अगदी सामान्य होती. त्यामुळे डॉक्टर्सदेखील क्षणभरासाठी गोंधळले. 

डॉक्टरांनी महिलेला आरामात बसवले आणि मूर्ती हातात घेतली आणि देव पूर्णपणे ठिक असल्याचे समजावून सांगितले. देवाला उपचाराची आवश्यकता नाही. डॉक्टरांच्या तोंडून हे ऐकल्यानंतर महिलेला हायसे वाटले. त्यानंतर ती महिला आपल्या पतीसोबत मूर्ती घेऊन घरी परतली.

इंदरगड तहसीलच्या पडरी गावात राहणारी साजरी यादव गुरुवारी सकाळी घरी पूजा करत होती. दरम्यान, दिवा लावताना दिव्याची झळ देव्हाऱ्यातील श्रीकृष्णाच्या मुर्तीला पोहोचली. हे पाहून तिला खूप वाईट वाटले. ती दु:खी चेहऱ्याने माझ्याकडे आली आणि देवाला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी विनवणी करु लागल्याचे तिचा पती प्रमोद कुमार यांनी सांगितले. मी तिला खूप समजावले पण तिला काही ते पटले नाही, म्हणून आम्ही श्रीकृष्णाची मुर्ती घेऊन रुग्णालयात आल्याचे त्यांनी सांगितले. 

महिलेच्या आयुष्यातील ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये महिला भक्ती आणि विश्वासामुळे खूप भावूक झाली. देवाला काही झाले नसेल ना, तो बरा असेल ना? अशी खात्री झाल्यावरच ती घरी परतली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

अनेक भक्त भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीने भारावून गेल्याचे दिसून आले आहे. या कारणास्तव लोक श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन प्रवास करतात. मुर्तीला जेवण दाखल्यानंतरच ते स्वतः जेवतात.