मणिपूर Video प्रकरण: 'आमच्या समाजाला डाग लावला', म्हणत गावातील महिलांनीच जाळलं आरोपीचं घर

Manipur Viral Video Accused House Set On Fire: हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जमावामधील प्रमुख आरोपीला त्याच्या गावामधून अटक केली आहे. यानंतर गावकरीही संतापले आणि त्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 21, 2023, 01:38 PM IST
मणिपूर Video प्रकरण: 'आमच्या समाजाला डाग लावला', म्हणत गावातील महिलांनीच जाळलं आरोपीचं घर title=
आरोपीच्या घराला गावातील महिलांनीच लावली आग

Manipur Viral Video Accused House Set On Fire: मणिपूरमधील महिलांनी येथील कुकी समाजातील महिलांबरोबर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचं घराला आग लावली आहे. ही घटना चेकमाई परिसरामध्ये घडली आहे. अचानक या आरोपीच्या घरावर मोठ्या संख्येनं जमावाने हल्ला केला. या जमावाने आरोपीच्या घराला आग लावली. आरोपीच्या घराला आग लावल्याच्या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आग लावणाऱ्या जमावामध्ये बहुतांश महिला असल्याचं दिसत आहे. 

कोण आहे मुख्य आरोपी?

मणिपूरमध्ये 2 महिलांची नग्नावस्थेत धिंड काढल्या प्रकरणी आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत बुधवारी हुइरेम हेरोदास मेइतेई नावाच्या इसमाला अटक केली. महिलांची धिंड काढणाऱ्या गर्दीमधील हुइरेम हा आघाडीवर होता. पेची अवांग लीकाई येथे राहणारा 32 वर्षीय हुइरेम पीडित महिलेच्या छातीवर दोन्ही हात ठेऊन तिला शेतात घेऊन जाताना दिसत आहे. हुइरेमला अटक करण्यात आल्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेनं आरोपीचे 2 फोटो शेअर केलेत. पहिल्या फोटोत हा आरोपी व्हिडीओमधील स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत त्याला पोलिसांनी अटक केल्याचं दिसत आहे. या प्रकरणामध्ये एकूण 4 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

आरोपीच्या गावातील महिला एकत्र आल्या अन्...

पेची अवांग लीकाई गावातून आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर गावातील महिला एकत्र आल्या. त्यांनी चर्चा केली आणि या आरोपीच्या घरावर त्यांनी हल्ला केला. या महिलांनीच आरोपीच्या घराला आग लावली. मैतेई समाजातील या महिलांच्या नेत्या मिराई पैबई यांनी, "तो मैतेई असो किंवा इतर समाजाचा असो, महिला म्हणून आम्ही घडलेला प्रकार सहन करु शकत नाही. महिलेच्या प्रतिष्ठेविरोधातील घटना आम्ही सहन करु शकत नाही. आम्ही अशा लोकांना आमच्या समाजात ठेऊ शकत नाही. यामुळे आमच्या संपूर्ण मैतेई समाजाला डाग लागला आहे," अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

मोदींनी व्यक्त केला संताप

कुकी समाजातील या महिलांवर 4 मे रोजी अत्याचार झाला. तेव्हाचाच व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या प्रकरणी 18 मे रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये बलात्कार आणि हत्येच्या कलमांचा आता समावेश करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांमध्ये अन्य आरोपींनाही अटक करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. हा सर्व हिंसाचार घडला तेव्हा 800 ते 1 हजार लोकांची गर्दी घटनास्थळी होती. बी फीनोमा गावामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट दिसून येत आहे. संसदेपासून बॉलिवूडपर्यंत अनेकांनी या विषयावरुन आपला संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हा संपूर्ण प्रकार अत्यंत चिड आणणारा असल्याचं सांगतानाच कोणालाही सोडणार नाही असा इशारा आरोपींना दिला आहे. तसेच या घटनेमुळे सर्व 140 कोटी भारतीयांना शर्मेनं मान खाली घालावी लागत असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 

धक्कादायक घटनाक्रम

3 मे रोजी मणिपूरमध्ये 2 समाजांमध्ये हिंसाचार झाला. त्यानंतर 4 मे रोजी कुकी समाजाची वस्ती असलेल्या गावावर एका जमावाने हल्ला केला. त्यावेळी या गावातील 5 जणांचं कुटुंब हल्ला करणाऱ्या जमावापासून स्वत:ला वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने धावू लागलं. संपूर्ण गावावर जवळपास 1 हजार लोकांनी हल्ला केला. या जमावाने गावातील घरामध्ये शिरुन मोठ्या प्रमाणात लूटमार केली, गावातील अनेक घरांना आगही लावण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या कुटुंबाला वाचवलं. पोलीस या पीडितांना सुरक्षित स्थानावर घेऊन जात असतानाच जमावाने पोलिसांच्या तावडीतून या लोकांना आपल्या ताब्यात घेतलं. ज्या लोकांना पोलिसांकडून जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आलं त्यामध्येच या 2 पीडित महिला होत्या. या 2 महिलांबरोबर अन्य एक 50 वर्षीय महिला आणि 2 पुरुषही होते. या दोन्ही पुरुषांची जमावाने हत्या केल्यानंतर या पीडित महिलांवर लैंगिक अत्याचार केला.