रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी आज कुटुंबांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली.
यावेळी पंतप्रधान मोदींनी विखेपाटील यांची नात अनिशासोबत गप्पा मारल्या. पंतप्रधान मोदींनी अनिशाला चॅाकलेट देऊन काही वेळही तिच्या सोबत घालवला. मोदींनी तिला अनिशा नावाचा अर्थ विचारला. यावर तिने अनिशा नावाचा अर्थ देवी असं उत्तर दिलं.
काही दिवसांपासून अनिशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा हट्ट धरला होता. यासाठी वडिल सुजय विखे पाटील यांचा तिने पिच्छा सोडला नाही. 'ते प्राईम मिनिस्टर आहेत, ते कामात असतात' असं उत्तर वडिल सुजय विखे पाटील यांनी दिलं. पण अनिशाने हट्ट सोडला नाही.
अखेर "मी अनिशा आहे आणि मला तुम्हाला भेटायचंय" असा मेसेज बाबांच्या ईमेलवरून तिने थेट पंतप्रधानांना पाठवला. आणि काय आश्चर्य! थोड्याच वेळात मेलवर रिप्लाय आला. त्यात भेटण्याची वेळे नमूद होती. मोदींनी अनिषाचा हट्ट पुरवला.
ठरलेल्या वेळेनुसार विखेपाटील सहकुटुंब आज पंतप्रधान मोदींना भेटले. पंतप्रधान मोदींनी अनिषाला चॅाकलेट दिलं, आणि मग दोघांच्या गप्पा रंगल्या.
अनिषानं प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तुम्ही इथे बसता का ? हे तुमचं ऑफीस आहे का? यावर मोदींनी मिश्कील उत्तर दिलं, हे माझं ऑफीस नाही. मी कधी कधी येत असतो. आता तू आली म्हणून तुझ्या भेटीला मी आलो.
मोदींचं उत्तर संपण्याच्या आतच अनिशानं पुन्हा प्रश्न विचारल," तुम्ही गुजरातचे आहात का? मग तुम्ही राष्ट्रपती कधी होणार? यावर मोदी हसले. यानंतर सुजय विखेंनी अनिशाला थांबवलं. मोदींनी 15 मिनिट अनिशाशी मन मोकळेपणानं गप्पा मारल्या.