नवी दिल्ली : मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या नोटा चलनातून रद्द करुन वर्ष उलटला असला तरी अद्यापही जुन्या नोटा सापडत असल्याचं पहायला मिळत आहे.
मेरठ पोलिसांनी शुक्रवारी दिल्ली रोडवर असलेल्या राजकमल एन्क्लेव्हचे मालक संजय मित्तल यांच्या कार्यालयावर छापा टाकत ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत.
जप्त केलेल्या या नोटांची किंमत तब्बल २५ कोटींच्या घरात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक केली आहे.
पोलीस अधिक्षक मान सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एका व्यक्तीच्या माध्यमातून कमिशन देत नोटा बदलण्याचा सौदा झाला होता. ही माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार, १० दिवसांपासून पोलीस यांच्या मार्गावर होते.
त्यानंतर शुक्रवारी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकत २५ कोटी रुपयांच्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. हे पैसे प्लास्टिकच्या १० बॅग्जमध्ये ठेवण्यात आले होते.
या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मध्यस्थी करणाऱ्या दिल्लीतील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रॉपर्टी डिलर संजीव मित्तल हा पोलिसांचा छापा पडताच फरार झाला असून पोलीस त्याच्या शोधात आहेत.