नवी दिल्ली : एका युवकाने आपल्या प्रेमिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
कुल्लाई पहाडीगावात राहणाऱ्या रुप सिंह यादव याचं कलावती नावाच्या महिलेवर प्रेम होतं. कलावती आणि रुप सिंह यांच्यात अनेक वर्षांपासून प्रेम संबंध होते.
रुप सिंह याला कलावतीसोबत लग्न करायचं होतं. मात्र, कलावतीने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या रुप सिंह याने रविवारी कलावतीची कुऱ्हाडीच्या सहाय्याने हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपी रुप सिंह याने शेतात विष प्राशन केलं आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात दाखल झाला. पोलिसांनी रुप सिंह याला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केलं. तसेच त्याच्या परिस्थितीत सुधार झाल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली.
पोलीस अधिक्षक एन. कोलांची यांनी सांगितले की, महिला आणि आरोपी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम संबंध होते. रुप सिंह याला कलावतीसोबत लग्न करायचं होतं. यासाठी रुप सिंह कलावतीवर दबाव टाकत होता. मात्र, कलावतीने हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला.
कलावतीने पतीला तक्रार केल्यानंतर आरोपी रुप सिंह संतापला आणि रागाच्या भरात त्याने कलावतीची हत्या केली.