अहमदाबाद : भाजपनं गुजरातमध्ये सत्ता मिळवली असली तरी गेल्यावेळपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. आणि याला कारणीभूत आहे हार्दिक पटेल. पाटीदारांच्या आरक्षणाच्या मुद्यावरून हार्दिक पटेलांनी छेडलेल्या आंदोलनाचा फटका भाजपला बसलाय. नाराज पाटीदारांचा भाजपला कसा फटका बसला त्याचा हा वृत्तांत....
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींपाठोपाठ भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरले ते पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल. 'पास' अर्थात पाटीदार अनामत आरक्षण समितीच्या माध्यमातून हार्दिक पटेल यांनी सरकारविरोधात दंड थोपटले.
त्यांनी अथवा त्यांच्या संघटनेनं स्वत: निवडणुका लढवल्या नसल्या तरी काँग्रेसशी काँग्रेससोबत हात मिळवणी करून भाजपचा पराभव करण्याचा निर्धारच केला. हार्दिक पटेलांनी पाटीदारांचे प्राबल्य असलेल्या सौराष्ट्र, उत्तर गुजरात आणि पाटीदारांची मोठी संख्या असलेलेल्या मतदार संघांमध्ये सभांचा जोरदार धडाका लावला. त्यांच्या सभांना उत्स्फुर्त प्रतिसादही मिळाला. सभा संपण्यापूर्वी हार्दिक उपस्थितांना भाजपला मत न देण्याची प्रतिज्ञा देऊ लागला.
सभांमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या नाराज पाटीदार समाजानं मतपेटीतूनही आपली नाराजी व्यक्त करत आपली प्रतिज्ञा पूर्ण केल्याचं निकालांवरून दिसतंय. त्यामुळेच सौराष्ट्रमधल्या मोर्बी, अमरेली आणि जामनगर या जिल्ह्यांमध्ये भाजपला फार मोठा फटका बसला. सौराष्ट्रमध्ये काँग्रेसच्या जागा दुपटीनं वाढल्या. मात्र इव्हीएम मशीन्सवर पुन्हा संशय व्यक्त करत हार्दिक पटेलांनी भाजपविरोधात आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय.
पाटीदार हा भाजपचा पारंपरिक मतदार. मात्र आरक्षण, हमीभाव आणि रोजगाराच्या मुद्यावरून हा समाज भाजपवर नाराज होता आणि हार्दिक पटेलांनी या नाराजीला हवा देत भाजपविरोधात वातवरण तापवले. यामुळेच की काय, अस्वस्थ असलेल्या भाजपला मोदींच्या सर्वात जास्त सभा या सौराष्ट्रमध्ये घ्याव्या लागल्या. मात्र या सभांचा भाजपला कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे आता पुढच्या काळात ही दुरावलेली हक्काची मतपेटी मिळवण्याचं आणि हार्दिक पटेलांच्या आंदोलनला हाताळण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे.