नवी दिल्ली : लव्ह जिहाद प्रकरणात मुलीची संमती महत्त्वाची आहे, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मुलगी सज्ञान आहे, लग्नात तिची संमती महत्त्वाची आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणातील सुनावणीवेळी, सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण मत मांडले.
एका हिंदू महिलेशी केरळमध्ये राहणाऱ्या शफीन जहान याने डिसेंबर महिन्यात लग्न केलं, लग्नापूर्वीच या महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला. मात्र, केरळ हायकोर्टाने हे 'लव्ह जिहाद' प्रकरण असल्याचे सांगितलं आणि हा विवाह रद्द ठरवला.
मी स्वेच्छेने लग्न केले, असा दावा अखिला अशोकन उर्फ हादिया असे या महिलेचे सांगितले. जहानने केरळ हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाने ऑगस्टमध्ये या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश एनआयएला दिले.
या प्रकरणात सुप्रीम कोर्टात बंद लिफाफ्यात एनआयएनेही अहवाल सादर केला होता. यात कशा पद्धतीने हिंदू मुलींचे धर्मांतर केले जाते, तसेच ठराविक व्यक्तींचाच कसा सहभाग होता, याची माहिती एनआयएने दिली होती.
कारण जहानने अखिलाचे धर्मांतर केल्यावर तिच्याशी विवाह केला. या महिलेची सीरियातील आयसिसने त्यांच्या दलात भरती केली होती आणि जहान यात मध्यस्थ होता, असा आरोप आहे. महिलेचे वडील अशोकन के. एम यांनी हा धर्मांतर आणि मूलतत्त्ववादाचा प्रकार असल्याचा आरोप केला होता.