भाजपसाठी २०१४ च्या कामगिरीची पुनरावृत्ती कठीण- संजय राऊत

शिवसेनेला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी पाहायला आवडेल.

Updated: May 7, 2019, 05:55 PM IST
भाजपसाठी २०१४ च्या कामगिरीची पुनरावृत्ती कठीण- संजय राऊत title=

मुंबई: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी बहुमताचा आकडा गाठणे कठीण आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे भाजपला २८० जागा मिळणे कठीण आहे. भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी वर्तविलेले भाकीत योग्य आहे. निवडणुकीनंतर देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार असेल. भाजप देशातील सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल. मात्र, आतापर्यंतची परिस्थिती पाहता भाजपला २८० किंवा २८२ हा आकडा गाठणे कठीण जाईल. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला एनडीएतील मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल, असे राऊत यांनी म्हटले. शिवसेनेला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी पाहायला आवडेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी सोमवारी 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्येही याविषयीचे संकेत दिले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत देशात त्रिशंकू सरकार येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली होती. 

तत्पूर्वी राम माधव यांनीही भाजपला यंदा सत्तास्थापनेसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) मित्रपक्षांची गरज पडेल, असे वक्तव्य केले होते. लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना राम माधव यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. यावरून २०१४ प्रमाणे भाजपला एकहाती सत्ता स्थापन करता येणार नाही, याचा अंदाज आल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. या मुलाखतीत राम माधव यांनी उत्तर भारतात भाजपला २०१४ च्या तुलनेत फटका बसेल, हे मान्य केले. परंतु, ईशान्य भारत, ओदिशा आणि पश्चिम बंगालमधून त्याची भरपाई होईल. तरीही प्रस्थापितविरोधी ( अँटी-इन्कम्बन्सी) लाटेमुळे भाजपला गेल्यावेळसारखे यश मिळणार नाही, हे सांगायलाही राम माधव विसरले नाहीत.