मोदींमध्ये हिंमत असेल तर विकास आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी- प्रियंका गांधी

आजवरचा इतिहास पाहता या देशाने अहंकारी व्यक्तींना कधीही माफ केलेले नाही.

Updated: May 7, 2019, 05:21 PM IST
मोदींमध्ये हिंमत असेल तर विकास आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी- प्रियंका गांधी title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंमत असेल तर त्यांनी जनतेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विकास, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी, असे आव्हान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दिले. त्या मंगळवारी अंबाला येथील प्रचारसभेत बोलत होत्या. यावेळी प्रियंका यांनी म्हटले की, निवडणुकीच्या प्रचारात भाजपचा एकही नेता २०१४ साली दिलेल्या आश्वासनांविषयी बोलत नाही. ते कधी शहिदांच्या नावाने मतं मागतात तर कधी गांधी कुटुंबातील दिवंगत सदस्यांचा अपमान करतात. मात्र, या देशातील जनतेने अहंकारी नेत्यांना कधीच माफ केलेले नाही, हे ध्यानात राहू दे, असे प्रियंका यांनी म्हटले. 

यावेळी प्रियंका यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना दुर्योधनाशी केली. सध्या देशातील जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे. आजवरचा इतिहास पाहता या देशाने अहंकारी व्यक्तींना कधीही माफ केलेले नाही. महाभारतामध्ये दुर्योधनाचा अहंकारही असाच गळून पडला होता. श्रीकृष्ण दुर्योधनाची समजूत काढण्यासाठी गेला तेव्हा दुर्योधनाने त्याला पकडायचा प्रयत्न केला. परंतु, श्रीकृष्णाच्या विशाल रुपासमोर दुर्योधनाचा अहंकार नष्ट झाला, असे प्रियंका यांनी सांगितले. 

तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका सभेत काँग्रेसला राजीव गांधी यांच्या नावावर निवडणूक लढण्याचे आव्हान दिले होते. मी नामदारांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या चेल्यांना खुले आव्हान देतो की, त्यांनी बोफोर्स घोटाळ्याचा आरोप असलेल्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावावर निवडणूक लढवून दाखवावी, असे मोदींनी म्हटले होते.