शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपला, कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता?

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर अनेक एक्झिट पोल येणार आहेत. याची उत्सुकता अनेकांना आहे.

Updated: May 17, 2019, 09:22 PM IST
शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपला, कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता? title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या प्रचाराच्या तोफा संध्याकाळी सहा वाजता थंडावल्या. रविवारी १९ मे रोजी ८ राज्यांत ५९ जागांवर मतदान होत आहे. गेल्या महिनाभरापासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रणसंग्राम पाहायला मिळाला. आज, शुक्रवारी या रणसंग्रामाचा प्रचार संपला. आता सातव्या टप्प्यातील मतदान होईल आणि संपूर्ण निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे केंद्रात पुन्हा भाजपचे सकार येणार की काँग्रेस महाआघाडीचे सरकार येणार याचीच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, मतदान संपल्यानंतर अनेक एक्झिट पोल येणार आहेत. यात कोणाच्या बाजुने निकाल येईल याचे अंदाज व्यक्त केले जाणार आहेत. त्यामुळे याचीही उत्सुकता अनेकांना आहे.

सरकार आमचेच, यांचा दावा

आपले सरकार दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेत येईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत घेत व्यक्त केला. यावेळी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी भाजपला ३०० जागा मिळतील, असा दावा केलाय. भाजपच्या सहकारी पक्षांनाही जागा मिळतील, असेही शाह यांनी म्हटले.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, सर्व भाजपविरोधी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, असा दावा केला. देशातील लोकांनी काय ठरविले आहे, हे मी आताच सांगू शकत नाही. लोकांचा कल २३ मे रोजीच कळेल, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.

पश्चिम बंगालकडे लक्ष

शेवटच्या टप्प्यातल्या प्रचारात सर्वाधिक चर्चेत राहिले ते पश्चिम बंगाल. इथे नऊ लोकसभा मतदारसंघात रविवारी मतदान होते आहे. पश्चिम बंगालमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि हिंसाचार शेवटच्या टप्प्यातल्या निवडणूक प्रचारात पाहायला मिळाला. पश्चिम बंगालमध्ये शिरकाव करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. तर तृणमूलचा किल्ला शाबूत ठेवण्यासाठी ममता बॅनर्जींनीही पूर्ण ताकद लावली आहे. 

उत्तर प्रदेशातल्या १३ लोकसभा मतदारसंघांतही रविवारी मतदान होत आहे. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतही मतदान होते आहे. वाराणसी वगळता इतरत्र मात्र चुरशीची लढत अपेक्षित आहे. त्यासाठी भाजपसोबतच काँग्रेस आणि सपा-बसपाने उत्तर प्रदेश पिंजून काढला. 

यांची प्रतिष्ठा पणाला

अंतिम टप्प्यात मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात मतदान होणार आहे. येथे काँग्रेसकडून अजय राय आणि आघाडीकडून शालिनी यादव रिंगणात आहेत. तसेच पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखवीर सिंह बादल फिरोजपूर येथून तर त्यांच्या पत्नी हरसमिरत कौर भटिंडा येथून निवडणूक रिंगणात आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पत्नी प्रणीत कौर पटियाला येथून तर तीन वेळा खासदार राहिलेले अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन दुमका येथून निवडणूक लढवित आहेत. पटणा साहिब येथून भाजपकडून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद तर काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा रिंगणात आहेत.