Code Of Conduct : आचारसंहिता म्हणजे काय? निवडणूक नियम कधी आणि का लागू होतात; सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडण आयोगाने आचारसंहिताची घोषणा केली आहे. पण आचारसंहिता म्हणजे काय? या काळात कुठल्या आणि कोणत्या गोष्टींवर असते बंदी जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Mar 16, 2024, 04:37 PM IST
Code Of Conduct : आचारसंहिता म्हणजे काय? निवडणूक नियम कधी आणि का लागू होतात; सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर title=
Lok Sabha Election 2024 What is Code of Conduct when and why election rules apply All questions answered in one click

Lok Sabha Election 2024 Code Of Conduct : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा अखरे संपली. लोकसभा 2024 च्या निवडणुका या 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 7 टप्प्यांमध्ये असणार आहे. तर 4 जूनला देशावर कोणाची सत्ता असेल हे समजणार आहे. तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार असून 19, 26 एप्रिल तसंच 7, 13 आणि 20 मे 2024 ला निवडणूक होणार आहे. 

निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्यामुळे आचार संहिता लागू झाली आहे. या दरम्यान जर आता कुठल्या पक्षाने किंवा उमेदवाराने पैसे वाटप केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा मुख्य निवडणूक आयोगाने आयुक्त राजीव कुमार यांनी दिला आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाची सर्व प्रकारच्या संशयास्पद व्यवहारांवर करडी नजर असणार आहे. साड्या, कुकर इत्यादी वाटपाशिवाय मनी पॉवरचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई होईल. तसंच प्रचारात लहान मुलांचा वापर करण्यावर बंदी आहे. 

निवडणुकीची आचारसंहिता काय असतं हे फार कमी लोकांना माहिती असल्याच दिसून आलंय. आचारसंहिता म्हणजे काय आणि ते कधी लागू होते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्या गोष्टींवर बंद असते या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. (Lok Sabha Election 2024 What is Code of Conduct when and why election rules apply All questions answered in one click)

आदर्श आचारसंहिता म्हणजे काय?

मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी निवडणूक आयोग काही नियमाची घोषणा करतात. हे नियम निवडणूक काळात पाळायचे असतात, त्या नियमांना आचारसंहिता असं म्हटलं जातं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष, नेते आणि त्या राज्यातील सरकार यांना हे नियम पाळणे बंधनकारक असते.  

आचारसंहिता कधीपासून लागू होते?

निवडणूक आयोगाकडून जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच आदर्श आचारसंहिता लागू होते. तर ही आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहते. 

विविध निवडणुकांमध्ये आचारसंहिता कशी लागू करतात?

लोकसभा निवडणूक असल्यास संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होत असते. तर विधानसभेसाठी निवडणूक असेल तर राज्यस्तरावर आचारसंहिता लागते. त्याशिवाय पोटनिवडणुकीची संहिता संबंधित मतदारसंघाच्या परिसरातच लागू होत असते. 

आदर्श आचारसंहितेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती?

आदर्श आचारसंहितेमध्ये राजकीय पक्ष, उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी निवडणूक प्रचार, सभा आणि मिरवणुका, मतदान दिवसाचे कामकाज आणि कामकाजादरम्यान कसे वागावे याबद्दल नियम सांगण्यात आलेले असते. 

प्रचार करताना राजकीय पक्ष/उमेदवारांसाठी मुख्य मार्गदर्शक तत्त्वे कुठली असतात?

निवडणूक प्रचारादरम्यान, कोणताही पक्ष किंवा उमेदवार परस्पर द्वेष निर्माण होईल किंवा विविध जाती आणि समुदायांमध्ये धार्मिक किंवा भाषिक तेढ निर्माण होईल असे कुठल्याही प्रकारचे कृत करु शकत नाही. अगदी  असत्यापित आरोप किंवा विकृतीवर आधारित टीका या काळात करत येत नाही.

निवडणूक प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा वापर करता येतो का?

मंदिरं, मशिदी, चर्च, गुरुद्वारा किंवा इतर धार्मिक स्थळं यांचा निवडणूक प्रचारासाठी व्यासपीठ म्हणून वापर करण्यावर आचार संहिता काळात बंदी असते. शिवाय, मत मिळवण्यासाठी जातीय किंवा जातीय भावनांना आवाहनही करणं चुकीच मानलं जातं. 

आचारसंहिता न पाळल्यास काय होतं?

आचारसंहितेचे पालन केले नाही तर कायदे आणि नियमांचे उल्लंघन मानले जाते. जी व्यक्ती किंवा पक्ष या नियमांचं उल्लघंन करते त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. त्या व्यक्तीला बडतर्फही केलं जातं. 

आचारसंहिता लागू झाल्यानंतर एखादा मंत्री आपला अधिकृत दौरा निवडणूक प्रचाराच्या कामाशी जोडू शकतो का?

आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही मंत्र्याने प्रवास दौरा केल्यास तो निवडणूक प्रचाराशी त्यांचा संबंध लावू शकत नाही. तसंच निवडणूक प्रचाराच्या कामात ते अधिकृत यंत्रणा किंवा कर्मचाऱ्यांचा वापरही करु शकत नाही. 

राजकीय पक्षांच्या नेत्यांना सरकारी बंगल्यात राहता येणार का?

आचारसंहिता लागू झाल्यानंतर नेत्यांना सरकारी बंगल्यात किंवा घरात राहता येणार नाही.

निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहनांचा वापर करता येतो?

आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही पक्षाच्या किंवा उमेदवाराला सरकारी विमान, वाहन इत्यादींसह कोणत्याही वाहनांचा वापर करता येत नाही. 

निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांची बदली किंवा बढती करता येते का?

आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि बढती करण्यावर बंदी असते. जर एखाद्या अधिकाऱ्याची बदली किंवा बढती अतिशय आवश्यक असेल तर त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगीची गरज असते. 

आचारसंहितापूर्वी मंजूर झालेल्या कोणत्याही योजनेची घोषणा किंवा उद्घाटन करु शकतात का?

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विशिष्ट क्षेत्रात अशा योजनेचे उद्घाटन/घोषणा करता येत नाही. एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजनदेखील करु शकत नाही. 

सामान्य लोकांनाही नियम लागू असतात का?

जर तुम्ही निवडणूक आणि एखाद्या राजकीय नेत्या किंवा पक्षाशी जोडलेले असाल तर तुम्हालाही या नियमाचे पालन करावे लागते. एखादा नेता किंवा पक्ष तुम्हाला कुठलंही काम सांगत असेल तर ते आचारसंहिताच्या विरोधात तर नाही ना हे तपासून घ्यावे. तुम्ही नियमाचं उल्लघंन केल्यास कारवाई होते. 

सरकारी कामांचे होर्डिंग्ज आणि नेत्यांचे फोटो वापरता येईल का?

आचारसंहिता काळात सरकारी कामांचे होर्डिंग्ज लावता येणार नाही. त्याशिवाय सरकारी भवनांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री राजकीय व्यक्ती यांचे फोटो वापरता येणार नाही.