नवी दिल्ली : जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १८ लाखांवर गेला असन १ लाख १४ हजार जणांनी जीव गमावला आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ८ हजार ४४७ झाली आहे. आतापर्यंत २७३ जणांनी यामध्ये जीव गमावला आहे. तर ७६५ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान केंद्र सरकारने आपले मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयात आपापले कामकाज संभाळण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्र सरकारने काही मंत्री आणि अधिकाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांच्याकडे वाहने आहेत आणि दिल्ली परिसरात राहतात असे मंत्री आणि अधिका-यांना कार्यालयात येऊन काम करण्यास सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री पण आपल्या कार्यालयात कामावर येत आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशाचे पालन केले जात असल्याचे केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी 'झी २४ तास'ला सांगितले.
केंद्र सरकारचे सर्व मंत्री आजपासून मंत्रालयात आपापले कामकाज संभाळतील. काम करताना सर्वांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रविवार संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून १ हजार ९८२ झाली. तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १ हजार पार झाली. यातील ९७१ जण तबलीगी जमातीच्या संपर्कात येऊन संक्रमित झाले.
देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ८,४४७वर पोहोचली आहे. मागच्या २४ तासामध्ये कोरोनामुळे ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ९०९ नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे आत्तापर्यंत २७३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७१६ जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.
२९ मार्चला कोरोनाग्रस्तांची संख्या ९७९ एवढी होती, ती आता ८,३५६ पर्यंत पोहोचली आहे. एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांना आयसीयू आणि व्हॅन्टिलेटरची गरज आहे. जवळपास १,०७६ रुग्णांना ऑक्सिजन व्हॅन्टिलेटर आणि आयसीयूची गरज पडेल, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं.
आयसीयू व्हॅन्टिलेटर आणि दुसऱ्या वैद्यकीय उपकरणांवरून गोंधळ होऊ नये, म्हणून आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढताच रुग्णालयांची आणि बेडची संख्या वाढवली जात आहे.