'जा जिंकून या, मग पुन्हा भेटू...'; लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिल्या सूचना

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पाच वर्षांच्या कृती आराखड्याला अंतिम रूप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचना दिल्या.

आकाश नेटके | Updated: Mar 4, 2024, 09:38 AM IST
'जा जिंकून या, मग पुन्हा भेटू...'; लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिल्या सूचना title=

PM Narendra Modi Meeting : देशभरात काही दिवसांतच  लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झालीय. भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून तिसऱ्यांचा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळासोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीतून लोकसभा निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय स्पष्ट शब्दात संदेश दिला. यावेळी जा जिंकून परत या. मी लवकरच तुम्हाला भेटेन, असे पंतप्रधान मोदी म्हणाल्याचे म्हटलं जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी आणि पुढील पाच वर्षांच्या कृती आराखड्याला अंतिम रूप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीनंतर मंत्र्यांना जिंकल्यानंतर आम्ही पुन्हा भेटू, असे सांगितले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणादरम्यान संयम बाळगण्याचा सल्ला दिला आणि सार्वजनिकपणे बोलताना शब्दांचा काळजीपूर्वक वापर करा, असे मंत्र्यांना सांगितले.

केंद्रीय मंत्रिमंडळाची ही बैठक 'विकसित भारत 2047' या कृती आराखड्याच्या संदर्भात आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये पुढील 5 वर्षांच्या सविस्तर कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या नव्या सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यसूचीवरही चर्चा झाली. गेल्या महिन्यातच पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना शंभर दिवसांचा कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ही बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधानांनी सुमारे तासभर मार्गदर्शन केल्याचे म्हटलं जात आहे.

येत्या जूनमध्ये संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, जो विकसित भारत दाखवेल, असेही पंतप्रधान म्हणाले. तसेच सीआयआय आणि फिक्की सारख्या व्यापारी संस्थांनी यावर चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच पंतप्रधानांनी या विभागांना याबाबत कृती आराखडा तयार करण्यास सांगितले आणि यावर विचार मांडण्यास सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे आता केंद्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

दरम्यान, या बैठकीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, हरदीप सिंग पुरी, किरण रिजिजू, अर्जुन मेघवाल आणि पियुष गोयल यांनीही आपल्या सूचना मांडल्या. या सूचनांचे पंतप्रधानांनी स्वागत केले. मे महिन्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तातडीने पावले उचलण्यासाठी 100 दिवसांच्या आराखड्यावर बैठकीदरम्यान त्याच्या जलद अंमलबजावणीसाठी चर्चा करण्यात आली. "विविध स्तरांवर 2,700 हून अधिक बैठका, कार्यशाळा आणि सेमिनार आयोजित करण्यात आले होते. 20 लाखांहून अधिक तरुणांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.