मोठा दिलासा : मागील चोवीस तासांत कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

देशातील एकूण रुग्णांचा आकडा... 

Updated: Jul 15, 2020, 06:57 PM IST
मोठा दिलासा : मागील चोवीस तासांत कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा विळखा भारतातही पाहायाला मिळत आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाचा अतिशय झपाट्यानं फैलाव होतो आहे. एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि या विषाणूनवर मात करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त सुरु असतानाच आता दुसरीकडे याच प्रयत्नांना काही अंशी का असेना, पण यश मिळत असल्याचं चित्र आहे. 

केंद्र शासनाकडून पुरवण्यात आलेल्या माहितीचा हवाला देत एएनआयनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मागील चोवीस तासांमध्ये कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 

केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नव्यानं तब्बल २०,५७२ रुग्णांनी कोरोना व्हायरसवर मात केल्यामुळं आता या संकटाला सामोरं जाऊन यशस्वीपणे कोरोनाचा नायनाट करणाऱ्या देशातील एकूण रुग्णांचा आकडा ५९१०३१ वर पोहोचला आहे. परिणामी देशभरात कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णसंख्येचा आकडा आता ६३.२४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 

 

दरम्यान, कोरोनाची नव्यानं लागण झालेल्या रुग्णांविषयी सांगायचं झाल्यास, मागील २४ तासांत देशात कोरोनाचे २९,४२९ रुग्ण वाढले असून ५८२ रुग्णांना मृत्यू झाला आहे. देशात कोरोना संक्रमितांची संख्या ९ लाख ३६ हजार १८१ वर पोहोचली आहे. सध्या देशात ३ लाख १९ हजार ८४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.