IAS अधिकारी सांगतात, मोठ्या हुद्द्यावरील नोकरीसाठी चांगले गुण नको, तर....

तुमचाही यावर विश्वास बसणार नाही

Updated: Jul 15, 2020, 04:53 PM IST
IAS अधिकारी सांगतात, मोठ्या हुद्द्यावरील नोकरीसाठी चांगले गुण नको, तर....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : जून आणि जुलै महिन्यांमध्ये सहसा निकाल, करिअर, विद्यार्थी आणि ओघाओघानं अतिशय वेगानं धावणारा हृदयाचा ठोका, असं काहीसं वातावरण पाहायला मिळतं. शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षांचा टप्पा ओलांडल्यानंतर विद्यार्थी त्यांच्या करिअरच्या वाटांवर निघतात, किंवा काहींच्या म्हणण्यानुसार हे टप्पे ओलांडल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याला योग्य ती दिशा मिळते. 

शैक्षणिक टप्पा, परीक्षा आणि त्याच परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी अनेकांचाच अट्टहास असतो. आपल्या पाल्यांची बौद्धि पातळी बाजुला सारत काही पालकही असाच आग्रही सूर आळवत असतात. पण, परीक्षेत मिळणारे गुण हेच सर्वस्व नसतं. किंबहुना त्यांच्या आधारे अमुक एका विद्यार्थ्याचं भवितव्यही ठरत नाही, हेच सध्या एका आयएएस अधिकाऱ्याची गुणपत्रिका सिद्ध करत आहे. 

IAS अधिकारी नितीन संगवान यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या बारावी इयत्तेती गुणपत्रिका सर्वांच्या भेटीला आणल्याचं म्हटलं जात आहे. सीबीएसईच्या बारावी इयत्तेतील २००२ या वर्षासाठीची त्यांची ही गुणपत्रिका पाहता ते अक्षरश: काठावर उत्तीर्ण झाल्याची बाब इथं समोर आली आहे. केमिस्ट्री या विषयात त्यांचे गुण घसरल्याचं या गुणपत्रिकेत पाहायला मिळत आहे. 

आपल्या या गुणपत्रिकेविषयी त्यांनी लिहिलं, 'बारावी इयत्तेमध्ये मला केमिस्ट्रीमध्ये २४ गुण मिळाले होते. उत्तीर्ण होण्यासाठीच्या अपेक्षित गुणांपेक्षा अवघा एक गुण जास्त. पण, मला जीवनात काय साध्य करायचं होतं, हे काही या गुणांना ठरवता आलं नाही. त्यामुळं आपल्या पाल्यांवर गुणांच्या अपेक्षेचं ओझं देऊ नका. बोर्डाच्या या निकालांच्या पलीकडेहील एक सुंदर आयुष्य आहे'. 

 

सोशल मीडियावर खुद्द आयएएस अधिकाऱ्यांकडून स्वत:चंच उदाहरण देत सर्वांपुढं ठेवलेला आदर्श पाहता नेटकऱ्यांनीही त्यांच्या या विचाराला दुजोरा दिला. अनेकांनीच त्यांचं हे ट्विट रिट्विटही केलं. तेव्हा गुणपत्रिकेवर छापलेल्या आकड्यांवरुन अर्थात गुणांवरुन कोणा एकाची गुणवत्ता किंवा त्याच्या / तिच्या भवितव्याचे तर्क लावण्याचा व्यर्थ प्रयत्न करत विद्यार्थ्यांचं खच्चीकरण केलं जाणार नाही याचीच काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.