VIDEO : हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचं लग्न, पण सोहळा सुरु असतानाच पोलीस आले आणि...

Kerala News : केरळच्या कोवलममध्ये लग्नाच्या काही मिनिटांआधी पोलिसांनी वधूला मंडपातून ओढून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण वेगवेगळ्या धर्मातील तरुण आणि तरुणीच्या लग्नाशी संबंधित होती. वधूला पोलिसांनी ओढून नेल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 19, 2023, 04:49 PM IST
VIDEO : हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचं लग्न, पण सोहळा सुरु असतानाच पोलीस आले आणि... title=

Viral Video : देशभरात गेल्या काही दिवसांपासून बळजबरीने धर्मांतर (conversion), दुसऱ्याच्या धर्माविषयी द्वेष पसरवणं यासारख्या विषयांच्या मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागल्या आहेत. मात्र काही ठिकाणी या सगळ्याला विरोध करुन हे सर्वकाही खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यामध्ये आता पोलिसही आडकाठी आणत आहेत का असा सवाल केला जात आहे. केरळमधल्या (Kerala News) एका घटनेनंतर हा सर्व वाद सुरु झाला आहे. केरळच्या कोवलममध्ये, रविवारी एका मंदिरात एक हिंदू तरुण आणि एक मुस्लिम तरुणी लग्न करणार होते. मात्र त्याआधीच पोलीस (Kerala Police) तेथे आले आणि त्यांनी एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे वधूला जबरदस्तीने घेऊन आपल्यासोबत घेऊन गेले. या घटनेच्या व्हिडिओमध्ये सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पोलीस वधूला खासगी गाडीतून घेऊन जाताना दिसत आहेत.

पोलिसांनी वर असलेल्या अखिललाही वधू अल्फियाकडे जाण्यापासून रोखल्याचे या घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक पोलीस अधिकारी गाडीत बसण्यासाठी अल्फियावर ओरडत आहे. त्यानंतर अल्फियाला गाडीच्या आत ढकलले जाते आणि इतर अधिकारीही त्यात बसतात आणि तेथून निघून जातात. पोलिसांनी अल्फियाला न्यायदंडाधिकारी न्यायालयात नेले होते. त्यानंतर आपण स्वत:च्या इच्छेने अखिलसोबत गेले होतो, असे अल्फियाने कोर्टात सांगितले. त्यानंतर अखिलही तिथे पोहोचला अल्फियाने आपलं म्हणणं नोंदवल्यानंतर त्या दोघांना जाण्याची परवानगी देण्यात आली.

या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी भाष्य केले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कायमकुलम पोलीस ठाण्यात अल्फिया हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे तिला न्यायालयात हजर करावे लागले. पोलिसांना अल्फियाला कोर्टात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ते फक्त त्यांचे कर्तव्य बजावत होते. अल्फियाने कोर्टात सांगितले की, तिला अखिलसोबत जायचे आहे त्यानंतर त्या दोघांना जाऊ दिले.

अल्फियाने सांगितले की, "मी काही दिवसांपूर्वी स्वत: च्या इच्छेने अखिलशी लग्न करण्यासाठी त्याच्यासोबत जात असल्याचे सांगितले होते तरी पोलिसांनी मला ताब्यात घेतले. कायमकुलम पोलीस ठाण्यात मी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार माझ्या पालकांनी केली होती. मी अखिलसोबत राहावे असे त्यांना वाटत नाही. त्यांना मला अखिलपासून दूर न्यायचे होते." तर कोवलम पोलीस ठाण्यामध्ये मला जाऊ दिले नाही. मला धक्काबुक्की केली आणि माझ्यासोबत गैरवर्तन केले. पोलिसांकडून असे वागणे अपेक्षित नव्हते. पोलिसांच्या या वागणुकीविरोधात तक्रार करणार आहोत, असे अखिलने सांगितले. दरम्यान, या घटनेनंतरही अखिल आणि अल्फियाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.