बंगळुरुच्या प्रसिद्ध Rameshwaram Cafec मध्ये बॉम्बस्फोट; काऊंटरवर ठेवलेल्या बॅगेचा अचानक स्फोट झाला

Rameshwaram Cafe Bomb Blast : बंगळुरुच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेत भीषण बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये एक व्यकी बॅग कॅफेत ठेवताना दिसत आहे. 

Updated: Mar 1, 2024, 07:04 PM IST
बंगळुरुच्या प्रसिद्ध  Rameshwaram Cafec मध्ये बॉम्बस्फोट; काऊंटरवर ठेवलेल्या बॅगेचा अचानक स्फोट झाला title=

Rameshwaram Cafe Bomb Blast : बंगळुरु भीषण बॉम्बस्फोटाने हादरलं आहे.  बंगळुरुच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेत (Rameshwar Cafe) बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया (karnataka cm siddaramaiah) यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. या स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती कॅफेच्या आत बॅग ठेवताना दिसत आहे. 

अनोळख्या व्यक्तीने ठेवली बॅग
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एक अज्ञात व्यक्तीने एक बॅग कॅशियर काऊंटवर ठेवली आणि काही वेळाने या बॅगेचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात 9 जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आईईडी ब्लास्ट आहे. बॅगेत एक आईईडी वस्तू मिळाली आहे, ज्याचा स्फोट झाला. स्फोटानंतर पोलिसांनी तात्काळ परिसरात तपास सुरु केला. इतर ठिकाणी कोणतीही संशयीत वस्तू सापडली नसल्याची माहिती आहे. दहशत निर्माण करण्यासाठी या व्यक्तीने स्फोट घडवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शुक्रवारी दुपारी 1 वाजता रामेश्वर कॅपेत कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. त्यानंतर आसपासच्या परिसरात धूर पसरला. स्फोटाची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. लोकं सैरावैरा पळू लागले. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी उच्च अधिकारी दाखल झाले आणि तपास सुरु करण्यात आला. 

मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी स्फोटाबाबत माहिती दिली. हा मोठा स्फोट नव्हता. पोलीस चौकशी करत आहेत, सुदैवाने स्फोटात जीवीतहानी झाली नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या व्यक्तीने कोणत्या उद्देशाने स्फोट घडवला याची माहिती अद्याप लागली नसून पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती रामेश्वरम कॅफेत शिरला त्यानंतरत्याने काऊंटरवरुन टोकन घेतलं आणि तिथेच बाजूला आपली बॅग ठेवली.

कर्नाटकचे गृहमंत्री डॉ जी परमेश्वरम यांनी स्फोटामागे कोणाचा हात आहे याचा तपास सुरु असल्याचं सांगितलं. पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांनी घटनास्थळाची पाहणी केली. बॉम्ब स्कॉडने घटनास्थळाची पाहणी केली असून स्फोटाचे काही सॅम्पल गोळा केले आहे, लवकरच आम्ही यामागे कोण आहे याचा शोध घेऊ असं डॉ जी परमेश्वरम यांनी सांगितलं आहे. 

स्फोटात जखमी झालेल्यांपैकी कोणीही गंभीर नसल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. पूर्ण माहिती मिळल्यानंतर स्फोटामागे काय उद्देश होता याची माहिती देऊ असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.