Job News : नोकरी... आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठीचं एक महत्त्वाचं माध्यम. मनाजोगी नोकरी, आपल्याला आवडेल तेच काम आणि अमुक एका क्षेत्रात प्रगतीच्या वाटांचे वाटसरु होण्यासाठी मिळणारी संधी या सर्व गोष्टी मागील काही वर्षांमध्ये केंद्रस्थानी आल्या आहेत. अर्थात प्रत्येक व्यक्तीनुसार त्यांना कमीजास्त महत्त्वं दिलं जातं. याच नोकरीच्या क्षेत्रामध्ये जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्क लिंक्डइनच्या (Linkdin) च्या वतीनं एक निरीक्षणपर अहवाल सादर करण्यात आला.
सदर अहवालानुसार भारतात दर 5 पैकी 4 जण म्हणजेच साधारण 80 टक्के नोकरदार व्यक्ती नव्या नोकरीच्या शोधात आहेत. नव्या संधी, नवा आणि वाढीव पगार या आणि अशा कैक कारणांनी नव्या नोकरीचा शोध घेण्यात येत आहे. पण, या संपूर्ण प्रक्रियेमध्येही या मंडळींना काही आव्हानांचा सामना करावा लागत असून, साधारण 55 टक्के इच्छुकांच्या मते नव्या नोकरीचा शोध घेण्याची प्रक्रिया तुलनेनं अधिक कठीण होत आहे. परिणामी ही प्रक्रिया अधिक सोपी आणि सुकर करत त्यात आवश्यक बदल करण्यात यावेत अशी मागणी नोकरदार वर्गानं केली आहे.
रोबोट टेक्निशिअन, एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनिअर या आणि अशा पदांशी संबंधिक 50 टक्के मंडळी नोकरीच्या शोधात आहेत. तर, 60 टक्के नोकरदार असेही आहेत ज्यांना आता नव्या क्षेत्रात काही नव्या भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडाच्या आहेत. 39 टक्के नोकरदार मंडळी नव्या नोकरीच्या शोधार्थ स्वत:लाच अपग्रेड करण्याच्या हेतूनं नवी कौशल्य शिकण्याला प्राधान्य देत आहेत.
2024 मध्ये जागतिक आर्थिक मंदीचा थेट परिणाम झाल्यामुळं नोकरीच्या क्षेत्रांवर याचा गंभीर परिणाम झाला. परिणामी 2025 च्या सुरुवातीपासूनच नव्या नोकरीचा शोध घेणाऱ्यांचा आकडा वाढल्याचं लक्षात आलं. यामध्ये अहवालानुसार 58 टक्के नोकरदारांना अपेक्षित क्षेत्रात अपेक्षित संधी मिळतील असा विश्वासही आहे.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही आव्हानं असून, नोकरीसाठी एकाहून अधिक कंपन्यांमध्ये अर्ज करूनही अपेक्षित उत्तर न येणं ही महत्त्वाची बाब आहे. हे प्रमाण 49 टक्के असून, आश्चर्य म्हणजे कंपन्यांनाचसही प्रक्रिया अधिक आव्हानात्मक भासते. यामध्ये 27 टक्के HR विभागांकडून दर दिवसाला तीन ते 5 अर्जांची छाननी करत काही अर्ज अपेक्षित निकषांची पूर्तता करणारे नसल्याचं कारणही अधोरेखित करण्यात आलं आहे.
थोडक्यात नोकरीची अपेक्षित संधी, अमुक एका पदासाठीच्या निकषांची पूर्तता आणि कर्मचारी म्हणून आस्थापनांशी असणारं विश्वासार्हतेचं नातं या सर्वच गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्यासच नोकरदार वर्गाला याचा फायदा होणार आहे हेच इथं स्पष्ट होतंय.