Pune Narayangaon Accident: ओव्हरटेकच्या मोहापायी 9 जणांनी गमावले प्राण; पुण्यात विचित्र अपघात

Narayangaon Accident: आज सकाळच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामध्ये सहा प्रवाशांची जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघांनी उपचारादरम्यान प्राण सोडले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 17, 2025, 12:52 PM IST
Pune Narayangaon Accident: ओव्हरटेकच्या मोहापायी 9 जणांनी गमावले प्राण; पुण्यात विचित्र अपघात  title=
सहा जाणांचा जागीच मृत्यू

Narayangaon Accident: पुणे-नाशिक महामार्गावर आज सकाळच्या सुमारास एक भीषण आणि तितकाच विचित्र अपघात घडला. या अपघातामध्ये दोन गाड्यांमध्ये येऊन एका गाडीचा अगदी चक्काचूर झाला. सदर अपघातामध्ये 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य काही प्रवासी गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना सध्या नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

नक्की घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे - नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळील मुक्ताई ढाब्या नजीक सकाळी हा अपघात झाला. आयशर टेम्पो आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसदरम्यान प्रावासी वाहतूक करणारी मक्झिमो गाडी आल्याने हा अपघात घडला. आयशर गाडीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो गाडीला मागून जोरदार धडक दिली. मॅक्झिमो गाडीमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी भरलेले असल्याने चालकाचं या गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ही गाडी थेट समोरच्या कोल्हापूर डोपोतील एसटी महामंडळाच्या बसला जाऊन धडकली. आयशर आणि बसदरम्यान सापडल्याने मॅक्झिमा कारचा चक्काचूक झाला आणि या छोट्या गाडीतील प्रवाशांना बाहेरही पडता आलं नाही. प्रत्यक्षदर्शींना दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना त्याची धडक मॅक्झिमोला बसला आणि हा अपघात घडला. 

सहा जणांचा जागीच मृत्यू तर तिघांनी उपचारादरम्यान सोडले प्राण

अपघात एवढा भीषण होता की मक्झिमोमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन प्रवाशांनी उपाचारादरम्यान प्राण सोडले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिकांबरोबरच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जवळच्या ग्रामी रुग्णालयात हलवलं. मक्झिमोच्या या विचित्र अपघातामुळे बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा सध्या पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

ग्रामीण भागामध्ये मागील काही वर्षात खासगी वाहनांची संख्या वाढल्याने बेकायदेशीररित्या होणाऱ्या प्रवासी वाहतुकीमधील प्रवाशांची संख्या घटली असली तरी वेळेत आणि पुरेश्याप्रमाणात एसटी बस उपलब्ध नसल्याने आजही अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे छोट्या अंतरावरील गावांमधून जिल्ह्याच्या गावांमध्ये प्रवासी वाहतूक चालते. 

राज्य शासनाकडून 5 लाखांची मदत जाहीर

"पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे," अशी पोस्ट आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.