IRCTC Tour Package: काही वर्षांपूर्वीचं देशातील चित्र पाहिलं, तर ठराविक महिन्यांत देशात पर्यटनाला बहर आलेला असायचा. पण, आता हे चित्र पदलत गेलं असून, जवळपास संपूर्ण वर्षभरात पर्यटकांचा ओघ देशातील विविध स्थळांकडे पाहायला मिळतो. मग ते बर्फाच्छादित प्रदेश असो किंवा दकिणेकडील राज्य असो. पूर्वोत्तर भारत असो किंवा राजस्थानचं वाळवंट असो. देशातील फिरस्त्यांच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ पाहता केंद्राकडून आणि पर्यायी विविध मंत्रालयांकडूनही अनेक उपक्रम आखले जात आहेत. यामध्ये रेल्वे मंत्रालय वेळोवेळी सरशी मारताना दिसतं.
काही दिवसांपूर्वीच IRCTC कडून (Kashmir) काश्मीर सफरीच्या टूर पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. ज्यानंतर आता लगेचच त्यांनी लडाख टूर पॅकेजचीही घोषणा केली आहे. त्यामुळं तुमच्या बकेट लिस्टमध्ये जर, लडाख Long Pending असेल तर हीच ती वेळ, जेव्हा तुम्हाला या ठिकाणी जाण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.
IRCTC कडून ट्विट करत या टूर पॅकेजबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्या माध्यमातून तुम्हाला लडाखमधील 6 उत्कृष्ट ठिकाणं फिरण्याची संधी मिळेल. जवळपास 8 दिवसांसाठी तुम्ही लडाखच्या भूमीवर एक वेगळाच अनुभव घ्याल. विमानप्रवास या सहलीचं प्राथमिक माध्यम असणार आहे. या पॅकेजसाठी 38650 आणि त्यापासून पुढचे पॅकेज IRCTC कडून देण्यात आले आहेत.
7 रात्री आणि 8 दिवसांसाठीच्या या टूर पॅकेजची सुरुवात जुलै महिन्यापासून होणार आहे. ज्यासाठी तुम्ही आतापासूनच बुकींग करु शकता. आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला हे बुकींग करता येईल. चंदीगढपासून सुरु होणाऱ्या या पॅकेजमध्ये तुम्ही भरत असणाऱ्या रकमेत राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय IRCTC कडून करण्यात येईल. या पॅकेजच्या माध्यमातून लडाख सफरीवर जाणाऱ्या पर्यटकांना थ्री स्टार होटेलमध्ये वास्तव्यास ठेवलं जाईल.
IRCTC चं हे पॅकेज तुम्हाला नुब्रा, तुरतुक, थांग झिरो पॉईंट, पँगाँग लेक, शाम व्हॅली, लेह सिटी आणि लेह मार्केट अशा ठिकाणांवर फिरण्याची संधी देईल. 'देखो अपना देश' या रेल्वेच्या नव्या उपक्रमाअंतर्गत हे पॅकेज तयार करण्यात आलं आहे.
Is #Ladakh on your #bucketlist? View the wondrous natural beauty of Ladakh with the Incredible Ladakh with IRCTC LTC Approved Ex Chandigarh #tourpackage. Book now on https://t.co/LFF4tVKPui@AmritMahotsav @incredibleindia @tourismgoi #azadikirail pic.twitter.com/vegqJOGDII
— IRCTC (@IRCTCofficial) May 11, 2023
राहिला प्रश्न पैशांचा, तर या सफरीसाठी सिंगल ऑक्यूपंसीसाठी 45,205 रुपये इतकं शुल्क आकारलं जाईल. तर, डबल ऑक्युपंसीसाठी 39,450 रुपये भरावे लागतील. तुमचा तिघांचा ग्रुप असल्यास या सहलीसाठी तुम्हाला प्रत्येकी 38650 रुपये इतका खर्च येतो. आता हा आकडाही लक्षात आलाय, वाट कसली बघताय? लडाखला जायची संधी दररोज येत नाही. चला... घाई करा!