Indian Railway : देशातल्या देशात फिरायला जायचं म्हटलं की, अनेकांनाच चिंता लागून राहते ती म्हणजे Confirm तिकीटाची. लांबचा प्रवास असल्यामुळं अनेकदा तिकीट कन्फर्म असणं सोयीचं समजलं जातं. प्रत्यक्षात मात्र हे तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांना बराच आटापिटा करावा लागतो. पण, यंदाच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये किमान ही चिंता मिटणार आहे. कारण भारतीय रेल्वे विभागानं आखलाय एक खास बेत.
1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी रेल्वे विभागाकडून 6000 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळं दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ पुजेसह दसरा आणि दरम्यानच्या इतरही उत्सवांदरम्यान सहजपणे देशात कुठंही भ्रमण करता येणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी या विशेष रेल्वेंची संख्या 25 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. मागील वर्षी हा आकडा 4429 वर होता.
पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार 6000 पैकी पश्चिम रेल्वे 1382 रेल्वे सोडणार असून, यामध्ये 86 रेल्वे फेस्टीव्ह स्पेशल श्रेणीतील असतील. भारतीय रेल्वेच्या एकूण नोंदीत हा मोठा आकडा ठरत आहे. या विशेष सेवांमध्ये देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतून विविध ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे निघतील.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गापूजा, दिवाळी आणि छठपुजेदरम्यान कोट्यवधी नागरिक देशभरात रेल्वेनं प्रवास करतात. पुढील दोन महिन्यांमध्ये या रेल्वेंच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुकर होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या मोठी असेल. परिणामी प्रवासी संख्येतही मोठी भर पडणार ही शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत, अती गर्दीमुळं त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठीच रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेच्या वतीनं सोडण्यात येणाऱ्या या ट्रेनमध्ये 86 स्पेशल ट्रेन असतील. या रेल्वे गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर भारत आणि पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर भारतानं जाणाऱ्या असतील. त्यामुळं या भागांमध्ये भटकंतीसाठी निघणाऱ्यांचा आकडाही वाढणार आहे. या विशेष रेल्वे गाड्यांसंदर्भातील अधिकृत आणि सविस्तर माहिती रेल्वे विभाग जाहीर करणार असून, प्रवाशांना अधिक माहितीसाठी रेल्वेच्या संकेतस्थळांना भेट देण्याचं आवाहन प्रवाशांना करण्यात येत आहे.