Indian Railway : ट्रेन लेट का होतात? जाणून घ्या का बिघडतं भारतीय रेल्वेचं वेळापत्रक

Indian Railway : भारतीय रेल्वेच्या वतीनं आजवर प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पण, हीच रेल्वे काही कारणांनी मात्र काहीशी कुप्रसिद्ध आहे. ते कारण म्हणजे रेल्वेचं On Time नसणं.   

सायली पाटील | Updated: Aug 23, 2023, 03:45 PM IST
Indian Railway : ट्रेन लेट का होतात? जाणून घ्या का बिघडतं भारतीय रेल्वेचं वेळापत्रक  title=
Indian Railway why do Trains Run Late know the reason

Indian Railway : देशात दैनंदिन प्रवास असो किंवा मग एखाद्या लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाणं असो अनेकजण रेल्वेमार्गानंच प्रवास करण्याला प्राधान्य देतात. खिशाला परवडणारा आणि वेळेची बचत करणारा असा हा प्रवास तुम्हीही केलाच असेल. अनेकांसाठी रेल्वेप्रवास कंटाळवाणा असतो तर, काही मंडळी हे क्षणही त्यांच्या परिनं जगतात. थोडक्यात रेल्वे प्रवासावर अवलंबून असणारा भारतीयांचा आकडा मोठा आहे. पण, जेव्हा गरजेच्याच वेळी ती वेळेवर येत नाही, तेव्हा मात्र चांगलीच पंचाईत होते. 

लोकल म्हणू नका किंवा मग लांब पल्ल्याच्या गाड्याच काही मिनिटांनी का असेना या रेल्वेगाड्या उशिरानंच धावतात. इतक्या, की त्या वेळेत आल्या की प्रवाशांनाही अप्रूपच वाटतं. एका प्रसिद्ध वृत्तमाध्यमाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी म्हणजेच 2022-23 या चालू आर्थिक वर्षामध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत वेळेत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या मोठ्या फरकानं घटली आहे. यामध्ये मेल आणि एक्स्प्रेसचाही समावेश आहे. म्हणजेच 27 टक्के ट्रेन उशिरानं धावत आहेत. सोप्या शब्दांत सांगावं तर दर चौथी Trail Late आहे. 

एका वर्षात परिस्थिती बिघडली? 

सध्याच्या परिस्थितीती गतवर्षाशी तुलना केल्यास लक्षात येतं की मागील वर्षी साधारण 84 टक्के रेल्वेगाड्या वेळेवर धावत होत्या. पण, वर्षभरातच हा आकडा आणखी खाली आला आणि उशिरा धावणाऱ्या रेल्वेंमध्ये 11 टक्क्यांची वाढ झाली. 

हेसुद्धा वाचा : पोटभर खा, मनसोक्त फिरा; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर भटकंती करणारी श्रिया पिळगावकर देतेय Travel Goals 

रेल्वेगाड्यांना का बरं उशीर होतो? 

रेल्वे/ ट्रेन वेळेवर न येण्यामागे अनेक कारणं आहेत. सध्या सुरक्षित प्रवासाच्या अनुषंगानं स्टॉप सिग्नल यंत्रणेचंही काटेकोरपणे पालन केलं जात आहे. तर, दुसरीकडे रेल्वे रुळांवरही लक्ष दिलं जात आहे. शिवाय रेल्वे विभागानं अनेक नवी विकासकामंही हाती घेतली आहेत. त्यामुळं रेल्वेगाड्या त्यांच्या निर्धारित स्थानकांवर वेळेत पोहोचू शकत नाहीयेत. मागील काही महिन्यांमध्ये रेल्वे अपघातांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. मग ती तो मालगाडी अपघात असो किंवा एखादा इतर अपघात. या परिस्थितीचाही रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होताना दिसत आहे. विविध रेल्वे मार्गांवर सुरु असणारी बांधकामं, नव्या मार्गांची चाचणी, सिग्नल यंत्रणांतील बिघाड पाहता प्राधान्यत्रमानं ठरलेल्या वेळेनुसार रेल्वेगाड्यांना सोडलं जातं. यात त्यांच्या वेळा वरील कारणांमुळं बऱ्याचदा उशिरानं येतात.