Mission Chandrayaan-3 : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने (Seema Haider) आता चांद्रयान-3 साठी व्रत ठेवलं आहे. याचा व्हिडिओ सीमाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर (Instagram) शेअर केला आहे. माझी तब्येत चांगली नाहीए पण चांद्रयानच्या यशासाठी आपण व्रत ठेवल्याचं तीने या व्हिडिओत सांगितलं. जोपर्यंत यान चंद्रावर उतरत नाही तोपर्यंत मी अन्नत्याग केला असल्याचं सीमाने म्हटलं आहे. आपल्या भारत देशाची चांद्रयान मोहिम यशस्वी व्हावी यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करत असल्याचंही सीमाने सांगितलं. चांद्रयानच्या यशामुळे माझ्या भारत देशाचं नाव संपूर्ण जगात उज्ज्वल होईल. यासाठी राधे-कृष्णाकडे आणि कोटी देव-देवतांकडे प्रार्थना करत असल्याचं तीने म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप मेहनत करत आहेत. चांद्रयान मोहिम यशस्वी झाल्यास संपूर्ण जगात भारताचा दबदबा निर्माण होईल. माझा भारत देश जगात सर्वात पुढे असावा यासाठी प्रार्थना करत असल्याचंही सीमाने म्हटलं आहे.
उरले अवघे काही तास
संपूर्ण जगभरात चांद्रयान मोहिमेची उत्सुकता लागली आहे. संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारत इतिहास लिहिणार आहे. याच वेळी चंद्रावर सूर्याचा प्रकाश पडणार आहे. आणि या चमचमत्या प्रकाशात लँडर विक्रम चंद्रावर पाऊल ठेवणार आहे.. समोर लाखो आव्हानं आहेत पण त्यांचा सामना करायला चांद्रयान-3 सज्ज आहे. लँडर विक्रम पुढे सरकतंय आणि लँडरमध्ये असलेलं प्रज्ञान रोवरही चंद्रावर उतरण्याची वाट पाहतंय. विक्रम आणि प्रज्ञानकडे भारताचंच नाही तर सगळ्या जगाचं लक्ष लागलंय. रशियाचं मिशन लूना नापास झाल्यावर चांद्रयान 3 मोहिमेबद्दलची उत्सुकता वाढलीय.
सध्या लँडर चंद्राच्या 25 किलोमीटरच्या परिघात प्रदक्षिणा मारतंय. चांद्रयान चंद्रावर लँड होण्याआधीची 15 मिनिटं अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. चांद्रयान चंद्राकडे झेपावल्यानंतर इस्रोचा त्याच्याशी संपर्क कायम आहे. मात्र या शेवटच्या 15 मिनिटांत इस्रो कुठलीही कमांड देऊ शकणार नाही. चंद्रावर सुरक्षित सॉफ्ट लँडिग करण्याची जबाबदारी शेवटी लँडर विक्रमच्याच खांद्यावर असणार आहे. योग्य उंची ठेवून, योग्य प्रमाणात इंधनाचा वापर करण्याची जबाबदारीही लँडरची असणार आहे. विक्रम लँडरचे सेन्सर्स आणि दोन इंजिन्सनी काम करणं बंद केलं तरीही चंद्रावर सॉफ्ट लँडिंग शक्य होणार आहे.
चंद्रावरच्या पृष्ठभागावर लँडिंगसाठी योग्य जागा निवडणं हे विक्रम लँडरसाठी मोठं आव्हान असणार आहे. ही निवड बरोबर झाली तर पुढची प्रक्रिया सोपी होईल. चांद्रयान 2 मध्ये ज्या चुका झाल्या, त्या सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न इस्रोनं केलाय. चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचं काऊंटडाऊन सुरू झालंय. अवघ्या काही तासात अवकाशात नवा इतिहास लिहायला भारत सज्ज झालाय. त्याचे साक्षीदार व्हा.