भारत-अमेरिका दरम्यान ३०० कोटी डॉलर्सचा संरक्षण करार

अमेरिका आणि भारत यांच्यात संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी ३०० कोटी डॉलरचा करार करण्यात आला. 

Updated: Feb 25, 2020, 06:42 PM IST
भारत-अमेरिका दरम्यान ३०० कोटी डॉलर्सचा संरक्षण करार  title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर सीएए मुद्यावर भाष्य केले आहे. प्रत्येक देशात धार्मिक स्वातंत्र अबाधित राहायला हवे, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारतात धार्मिक स्वातंत्र्य अधिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी चांगलं काम करत असल्याची पावतीही त्यांनी दिली. दरम्यान, संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये ३०० कोटी डॉलरचा करार करण्यात आला. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती मोदी आणि ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये ३०० कोटी डॉलरचा करार करण्यात आला. अमेरिका भारताला आपाचे लढावू हेलिकॉप्टर पुरवणार आहे. तर भारताची ऊर्जा आणि इंधनाची गरज भागवण्यासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याची ग्वाही ट्रम्प यांनी दिली. 

एकीकडे हैदराबाद हाऊसमध्ये भारत अमेरिका द्विपक्षीय चर्चा सुरू असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीतल्या सर्वोदय शाळेला भेट दिली. मेलानिया यांच्या भेटीबाबत विद्यार्थी आणि शिक्षक खुपच उत्सुक होते.  मेलानिया यांचं शाळेत स्वागत होताच विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषेत त्यांचं औक्षण करून स्वागत केलं. त्यानंतर मेलानिया यांनी संपूर्ण शाळेची पाहणी केली. मेलानिया यांच्यासाठी एक खास वर्ग भरवण्यात आला होता. हॅपीनेस क्लास असं या वर्गाचं नाव होतं. या वर्गात मेलानिया यांनी मुलांशी संवाद साधला. तसंच विद्यार्थ्यांना गाणी, कविताही शिकवल्या.