Only Constitution Literate District In India: तुम्ही संविधान वाचलं आहे का? असा प्रश्न विचारल्यास अनेकांचं उत्तर नाही असं असेल. पण भारतात एक जिल्हा असा आहे जेथील सर्व नागरिकांना संविधान अगदी तोंडपाठ आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. या राज्यातील प्रत्येक व्यक्तीने भारताचं संविधान संपूर्णपणे वाचलं आहे. विशेष म्हणजे सर्व लोकांनी संविधानाची प्रत वाचलेला हा भारतामधील एकमेव जिल्हा आहे. हा जिल्हा कोणता आणि या ठिकाणी प्रत्येकाने संविधान का वाचलं आहे हे जाणून घेऊयात...
ज्या जिल्ह्याबद्दल आपण बोलत आहोत त्याचं नाव आहे कोल्लम. हा जिल्हा केरळमध्ये असून देशातील सर्वात साक्षर जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्यामध्ये 10 वर्षांहून अधिक वय असलेल्या प्रत्येक मुलाला संविधानाचं मूलभूत ज्ञान आहे. 2 वर्षांपूर्वी केरळच्या नागरिकांना संविधानासंदर्भात साक्षर बनवण्यासाठी एक मोहीम सुरु करण्यात आली होती. या मोहिमेचं नाव होतं, ‘सिटीझन प्रोग्राम’! याच मोहिमेमुळे या जिल्ह्यातील महिला असो, पुरुष अधिकारी असो किंवा कर्मचारी असो सर्वांनी एकदा ना एकदा तरी संविधान वाचलं आहे. विशेष म्हणजे लिहिता वाचता येणाऱ्या अगदी शेतकरी, कामगार आणि मजुरांपर्यंत ही मोहीम पोहोचली आहे.
कोल्लमची लोकसंख्या 14 लाखांहून अधिक आहे. यामध्ये कोल्लम जिल्हा पंचायत, कोल्लम जिल्हा योजना समिती आणि केरळ इन्स्टीट्यूट ऑफ लोकल अडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून ‘सिटीजन 2022’ अंतर्गत सर्व शिक्षित नागरिकांमध्ये संविधानासंदर्भात जनजागृती केली. सर्वांनी संविधान एकदा तरी वाचलं पाहिजे असा या मोहिमेचा हेतू होता. या मोहिमेचा खरोखरच फायदा झाला आणि आज या जिल्ह्यातील 10 वर्ष वायापेक्षा मोठ्या जवळजवळ प्रत्येक व्यक्तीने एकदा ना एकदा तरी संविधान वाचून काढलं आहे.
केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील थेनमेला गावातील मनरेगाअंतर्गत काम करणारी महिला मजूर वासंधी अभिमाने आपण संविधान वाचल्याचं सांगते. “माझ्याकडे हातोडा आणि संविधान दोन्ही गोष्टी आहेत,” असं वासंधी सांगते. केरळ इंस्टीट्यूट ऑफ लोकल अडमिनिस्ट्रेशनने जिल्ह्यातील बहुतांश लोकांपर्यंत संविधानाची प्रत पोहचेल अशी व्यवस्था केली आहे. ही प्रत अनेकांनी वाचली आहे. संविधान हे समानतेचा संदेश देतं. ते समजण्यास सोपं आहे. संविधानातील महत्त्वाचे मुद्दे अनेकजण त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडू शकतात, असं या मोहिमेत सहभागी झालेले अधिकारी सांगतात.
14 जानेवारी 2023 रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी कोल्लमला भारतामधील पहिला संविधान साक्षर जिल्हा म्हणून घोषित केलं होतं. 2000 हून अधिक नागरिक 2022 प्रशिक्षकांनी त्यांच्या आजूबाजूच्या 7 लाखांहून अधिक कुटुंबातील लाखो लोकांना संविधान साक्षर केलं. या जिल्हाशी संबंधित एकूण 16 लाखांच्या आसपास लोक संविधान साक्षर ठरले आहेत. या लोकांना संविधानातील मूळ बाबी ठाऊक आहेत. कोल्लम जिल्हायाचा समाजिक आणि प्रयोगशिल आंदोलनांमध्ये कायमच सहभाग राहिला आहे. 1991 साली साक्षरता आंदोलनामध्ये जिल्हा 100 टक्के साक्षर झाला होता. 1996 साली आयोजित करण्यात आलेल्या जन योजना मोहिमेमध्ये सामान्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला.