तामिळनाडूचे भाजपा प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी स्वत:ला सहा वेळा चाबकाने फटके मारले आहेत. ANI ने शेअर केलेल्या व्हिडीओत के अण्णामलाई हिरव्या रंगाची लुंगी घालून स्वत:ला मोठ्या चाबकाने फटके मारताना दिसत आहेत. यादरम्यान, आजुबाजूला उभे लोक घोषणा देताना दिसत आहेत. सहा वेळा चाबकाने फटके लगावल्यानंतर सातव्यांदा जेव्हा ते फटका मारण्यास जातात तेव्हा एक समर्थक धावत त्यांच्याकडे जातो आणि त्यांना मिठी मारुन थांबवतो.
पण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वत:ला चाबकाने का मारत आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं कारण असं आहे की, भाजपाच्या या वरिष्ठ नेत्याने आपल्या मेगा आंदोलनाला सुरुवात करण्याआधी स्वत:ला चाबकाने सहा वेळा फटके मारण्याची शपथ घेतली होती. या आंदोलनात 48 दिवसांचं उपोषण आणि अनवाणी जाण्याच्या वचनाचा समावेश आहे. यामागे 2026 विधानसभा निवडणुकीत डीएमकेचा पराभव करण्याचा हेतू आहे.
"ज्यांना कोणाला तामिळ संस्कृती कळते त्यांना हे समजेल. स्वत:ला चाबकाने मारणे, शिक्षा देणे हा संस्कृतीचा भाग आहे," असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
#WATCH | Coimbatore | Tamil Nadu BJP president K Annamalai self-whips himself as a mark of protest to demand justice in the Anna University alleged sexual assault case. pic.twitter.com/ZoEhSsoo1r
— ANI (@ANI) December 27, 2024
"हा (त्याचा निषेध) कोणत्याही व्यक्ती किंवा गोष्टीविरोधीत नाही, तर राज्यात सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आहे," असं अण्णामलाई यांनी पत्रकारांना सांगितलं. "अण्णा विद्यापीठात जे काही घडले हे तर फक्त निमित्त आहे. तुम्ही पाहिल्यास गेल्या 3 वर्षात काय घडत आहे. सामान्य लोकांवर, महिलांवर आणि मुलांवर होणारा सतत अन्याय आणि भ्रष्टाचार सुरु आहे," असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
"म्हणून, काल मी जाहीर केले की आम्ही (या खाली) जाण्याचा मार्ग निवडला आहे, ज्यावर माझे बरेच पूर्वज चालले होते ज्यामध्ये ते स्वतःला फटके मारत होते," असं त्यांनी सांगितलं.
या आठवड्यात चेन्नईच्या अण्णा विद्यापीठातील एका विद्यार्थिनीवर झालेल्या भीषण लैंगिक अत्याचारामुळे आणि तिच्या मित्राला झालेल्या मारहाणीमुळे अण्णामलाई यांच्या निषेधाला सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या कडेला फूड स्टॉल चालवणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याने कबुली दिल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले.