मुख्यमंत्र्यांचे भाषण वाचून दाखवल्यानंतर स्टेजवरच कोसळले आरोग्यमंत्री; जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात केले दाखल

Independence Day 2023 : मध्य प्रदेशात 15 ऑगस्ट रोजीच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री डॉ.प्रभूराम चौधरी हे अचानक स्टेजवर कोसळले. मध्य प्रदेशातील रायसेन शहरातील स्थानिक होमगार्ड परेड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडला.

आकाश नेटके | Updated: Aug 15, 2023, 02:17 PM IST
मुख्यमंत्र्यांचे भाषण वाचून दाखवल्यानंतर स्टेजवरच कोसळले आरोग्यमंत्री; जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात केले दाखल title=

Independence Day 2023 : देशभरात 77 वा स्वांतत्र्यदिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सकाळी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले आहे. दुसरीकडे देशभरातल्या सर्वच राज्यात स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला आहे. पण मध्य प्रदेशात (MP News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील रायसेनमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात आरोग्यममंत्री अचानक खाली कोसळल्याने खळबळ उडाली होती. मुख्यमंत्र्यांचे भाषण वाचून दाखवताच आरोग्यमंत्री खाली कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील रायसेन येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आलेले आरोग्यमंत्री डॉ.प्रभूराम चौधरी स्टेजवर कोसळल्याने धावपळ उडाली. आरोग्यमंत्री डॉ.प्रभूराम चौधरी यांनी आधी मुख्यमंत्र्यांचा संदेश परेडमध्ये वाचून दाखवला. यानंतर अचानक त्यांची तब्येत इतकी बिघडली की ते स्टेजवरच चक्कर येऊन पडले. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी आरोग्यमंत्र्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

साखरेची पातळी वाढल्याने मंत्री डॉ.प्रभूराम चौधरी हे बेशुद्ध पडल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली. आरोग्यमंत्र्यांची साखरेची पातळी वाढल्याने त्यांना चक्कर आल्याने ते स्टेजवर पडले. उपचारानंतर ते स्वतः हॉस्पिटलमधून बाहेर पडले आणि मी पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिक्षकांनी दिली. दुसरीकडे, सिव्हिल सर्जन डॉ. अनिल ओध यांनी सांगितले की, डॉ.प्रभूराम चौधरी हे बराच वेळ उभे राहिले होते. त्यामुळे त्यांचे रक्ताभिसरण थांबले आणि हृदयापर्यंत पोहोचणारे रक्त कमी झाले आणि ते खाली पडले. त्यांचा रक्तदाब आणि साखर तपासण्यात आली, ती नॉर्मल होती. आता ते निरोगी आहेत.

दुसरीकडे, मध्य प्रदेशच्या मौगंज जिल्ह्यात विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांनाही मंचावरच चक्कर आली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ खुर्चीवर बसवले. डॉक्टरांनी बीपी आणि इतर तपासण्या केल्या. कार्यक्रमानंतर त्यांना रीवा येथे नेण्यात आले. मंचावर उष्णता आणि आर्द्रतेमुळे काही समस्या निर्माण झाल्या होत्या. जास्त वेळ उभे राहिल्याने आणि अशक्तपणामुळे त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. कार्यक्रमाला उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली. विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांची प्रकृती आता सामान्य आहे.