'आमच्याकडे देशभरात आंदोलनं घडवायची ताकद असती तर मोदी सत्तेत आलेच नसते'

या सगळ्या हिंसाचाराला पंतप्रधान, गृहमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळ जबाबदार

Updated: Dec 16, 2019, 03:14 PM IST
'आमच्याकडे देशभरात आंदोलनं घडवायची ताकद असती तर मोदी सत्तेत आलेच नसते' title=

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA)विरोधात जामिया मिल्लिया इस्लामिया  (Jamia Millia Islamia) विद्यापीठात झालेल्या हिंसक आंदोलनाला काँग्रेसची चिथावणी असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. मात्र, CAA विरोधात देशभरात आंदोलने सुरु आहेत. परंतु, काँग्रेसकडे देशभरात अशाप्रकारची आंदोलने घडवायची ताकद असती तर नरेंद्र मोदी सत्तेवर आलेच नसते, अशी खोचक टिप्पणी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. CAA कायद्याविरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नवी दिल्लीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेतली. यावेळी गुलाम नबी आझादी यांनी म्हटले की, पोलिसांनी परवानगीशिवाय जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करणे अपेक्षित नव्हते. त्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरुंची परवानगी आवश्यक असते. मग पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या विद्यापीठात कोणाच्या परवानगीने शिरले?, असा सवाल गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केला. 

आम्ही या घटनेचा निषेध करतो. या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे. या सगळ्यामागे काँग्रेस असल्याचे पंतप्रधानांचे म्हणणे आहे. परंतु, काँग्रेसकडे अशाप्रकारे हिंसाचार घडवून आणण्याची ताकद असतीच तर तुम्ही कधी सत्तेवर आलाच नसता. त्यामुळे पंतप्रधानांचा हा आरोप निराधार आहे. या सगळ्या हिंसाचाराला पंतप्रधान, गृहमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळ जबाबदार असल्याचा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून देशभरात सुरु असलेल्या हिंसाचारच्या घटनांबद्दल दु:ख व्यक्त केले. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे महत्त्वाचे घटक आहेत. CAA मुळे देशातील कोणत्याही धर्माला धक्का लागणार नाही. ही वेळ एकता आणि बंधुभावाने राहण्याची आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.