नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यानं राजीनाम्यात असं काही लिहिलं, की Boss सुद्धा चक्रावले

या पठ्ठ्यानं ते थेट सांगण्याचंही धाडस केलं.   

Updated: Jun 21, 2022, 10:47 AM IST
नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यानं राजीनाम्यात असं काही लिहिलं, की Boss सुद्धा चक्रावले title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Harsh Goenka Shares Resignation Letter Of His Employee: एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा नोकरी करतो तेव्हा ते ठिकाण आपल्यासाठी दुसरं घर होऊन जातं. दिवसातचे जितके तास आपण घरात घालवत नाही, तितके तास आपण या नोकरीच्या ठिकाणी वेळ घालवत असतो. त्यामुळं नोकरीचं ठिकाण कायमच कोणत्याही व्यक्तीसाठी खास असतं. 

एका ठिकाणी नोकरीला असतानाच एखादी चांगली संधी चालून आल्यास त्या संधीचा स्वीकार करत पुढे जाण्याचा निर्णयही घेणारे आपल्यापैकी अनेकजण असतील. हल्लीची पिढी चांगला पगार, संस्था आणि चांगल्या संधीच्या शोधात असे निर्णय सातत्यानं घेताना दिसते. 

नोकरी सोडतेवेळी अशा मंडळींना त्यांच्या या निर्णयामागचं कारणंही विचारलं जातं. असंच एक कारण, व्यावसायिक हर्ष गोएंका यांना त्यांच्या कर्मचाऱ्यानं दिलं आणि त्यांनाही हादरा बसला. 

गोएंका यांनी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली. जिथं अवघ्या पाच शब्दांमध्ये या व्यक्तीनं नोकरी सोडल्याचं कारण त्याच्या राजीनाम्यात स्पष्ट केलं. हे कारण वाचून खुद्द हर्ष गोएंकाही विचारात पडले. 

'हे पत्र अगदी लहान आहे, पण हा मुद्दा अत्यंत गंभीर असून त्यावर आपण तोडगा काढणं गरजेचं आहे', असं लिहित गोएंकांनी आपलं मत मांडलं. 

नोकरीचा राजीनामा देत लिहिण्यात आलेल्या पत्रात राजेश नामक एका कर्मचाऱ्यानं म्हटलं, 'प्रिय हर्ष, मी राजीनामा देत आहे. मजा येत नाहीये'. त्याचे हे उदगार पाहता नोकरीच्या ठिकाणी कर्मचारी आता लक्ष्य गाठता गाठता मानसिकरित्या खचत चालल्याची बाब अधोरेखित केली आहे. 

बरं, बऱ्याच वरिष्ठांसाठी किंवा ज्यांच्या हाताखाली कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी ही एक मोठी सुचना. कारण, नोकरीच्या ठिकाणी कर्मचारी जीवापाड काम करुन निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी मेहनत घेतात. पण, या साऱ्यामध्ये त्यांचा उत्साह, कुतूहल आणि कलात्मकता मात्र गुदमरत आहे हेच या पत्रामुळं प्रकाशझोतात आलं आहे. 

विचार करा, तुम्ही नोकरी सोडण्यामागे हे एक कारण तर नाही?