Harni Lake Boat Incident: गुजरातच्या बडोद्यात गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. हर्णी येथे सहलीसाठी आलेल्या विद्यार्थांची बोट उलटून 14 विद्यार्थी आणि 2 शिक्षक ठार झाले आहेत. बोटीतून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवास करत होते. या विद्यार्थ्यांचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. हे सीसीटीव्ही असून यामध्ये विद्यार्थी गेटच्या बाहेर उभे असल्याचं दिसत आहे. यानंतर ते हर्णी तलाव परिसरात प्रवेश करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी भावूक झाले आहेत. कारण सीसीटीव्हीत दिसणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा शेवटचा क्षण होता. यानंतर पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी याप्रकरणी 18 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बडोद्यामधील या दुर्घटनेत पूर्णपणे निष्काळजीपणा करण्यात आला. बोटीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी घेण्यात आली नव्हती. त्यांना लाईफगार्ड घालण्यात आलं नव्हतं. सर्व विद्यार्थी येथे सहलीसाठी आले होते. गुजरात सरकारने प्रकरणाचा तपास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी 10 दिवसांच्या आत रिपोर्ट सादर करायचा आहे.
VIDEO | CCTV footage shows the students of New Sunrise School in Vadodara lining up outside the Harni lake zone, which ended in a boat tragedy. pic.twitter.com/a3dERq2atK
— Press Trust of India (@PTI_News) January 18, 2024
बडोदा पोलिसांनी याप्रकरणी वेगवेगळी 9 पथकं तयार केली आहेत. दोघांना अटकही करण्यात आलं आहे. कंत्राटदारापासून ते अनेकजण दोषी आढळले असून सर्वांना पकडलं जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. ही पथकं दिवस-रात्र तपास करुन प्रकरणाच्या तळापर्यंत जाणार आहेत. सर्व दोषींना अटक केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
ही दुर्घटना चूक नसून, पूर्पणणे निष्काळजीपणा आहे. याचं कारण बोटीत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवण्यात आलं होतं. फक्त 10 जणांना लाईफ जॅकेट घालण्यात आलं होतं. त्या विद्यार्थ्यांना वाचवण्यात बचाव पथकाला यश मिळालं आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना लाईफ गार्ड घालण्यात आलं नव्हतं त्यांना वाचवण्यात यश मिळू शकलं नाही.
सरकारने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 4 लाख आणि जखमींना 50 हजारांची मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. तसंच मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.