Kolkata Rape Horror: ‘अशी शिक्षा द्या की....’, सौरव गांगुलीचा संताप्, म्हणाला ‘सीबीआय आणि पोलीस....’

कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) करत आहे.

शिवराज यादव | Updated: Aug 17, 2024, 06:50 PM IST
Kolkata Rape Horror: ‘अशी शिक्षा द्या की....’, सौरव गांगुलीचा संताप्, म्हणाला ‘सीबीआय आणि पोलीस....’  title=

कोलकातामधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील  डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाने देश हादरला आहे. देशभरात संतापाची लाट असून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, "आम्ही किमान 30 संशयितांची ओळख पटवली आहे आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे". या घटनेवर फक्त सर्वसामान्य नागरिक नाही तर अनेक मोठे सेलिब्रिटीही व्यक्त होत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली यानेही यावर भाष्य केलं आहे.

सौरव गांगुलीने घटनेचा निषेध केला असून कडक शिक्षा दिली जावी अशी मागणी केली आहे. तसंच यावेळी त्याने आपल्या विधानावरून झालेल्या वादावरही स्पष्टीकरण दिले. काही सोशल मिडिया युजर्सनी गांगुलीने ही अनेक घटनापैंकी एक आहे असे विधान केल्याचा दावा केला होता. सौरव गांगुलीने आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असे म्हटलं आहे.

मी गेल्या रविवारी सांगितले की, मला माहित नाही की त्याचा अर्थ कसा लावला गेला किंवा ते कशा प्रकारे घेतले गेले. मी पूर्वीही सांगितले आहे, ही एक भयानक गोष्ट आहे. आता सीबीआय, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे घडले ते अत्यंत लज्जास्पद आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला दोषी सापडल्यानंतर कठोर शिक्षा व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे. शिक्षा अशी असावी की आयुष्यात पुन्हा असा गुन्हा करण्याचे धाडस कोणी करू नये. ते महत्त्वाचे आहे. शिक्षा कठोर असायला हवी,” असे सौरव गांगुलीने पत्रकारांना सांगितले.

कोलकाता रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येबद्दल वाढत्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर, इंडियन मेडिकल असोसिएशनने  (IMA) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यावेळी नियमित OPD सेवा आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत. तथापि, सर्व आपत्कालीन सेवा मात्र सुरु राहणार आहेत.

आरोग्य मंत्रालयाने आंदोलनकर्त्या डॉक्टरांना सार्वजनिक हितासाठी त्या कामावर रुजू होण्याची विनंती केली आहे., आरोग्यसेवा व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल असे आश्वासनही देण्यात आले आहे. राज्य सरकारांसह सर्व भागधारकांच्या प्रतिनिधींना त्यांच्या सूचना समितीसोबत शेअर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

भारतातील डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना IMA ने  निवासी डॉक्टरांच्या कामाची आणि राहणीमानाची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे..  विश्रांतीसाठी सुरक्षित ठिकाणे देण्याची  मागणीही केली आहे. तसेच  कामाच्या ठिकाणी हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा करण्याची मागणी केली.