मुंबई : भगवान श्रीकृष्णचं वाद्य म्हणून बासरीची ओळख आहे. बासरीच्या सुमधुर आवाजाने राधेसह अनेक गोपिका मंत्रमुग्ध व्हायच्या. अनेक दिग्गजांनी बासरीला एक वेगळीच उंची गाठून दिली. बासरी वादनात हातखंडा असलेलं आणखी एक नाव सध्या हळूहळू चर्चेत येत आहे.
सिक्कीममध्ये राहणाऱ्या या बासरी वादकाचं नाव हेमंत थापा असं आहे. यांची खासियत म्हणजे हे तोंडाने नाही तर नाकाने बासरी वाजवतात. एका नाकपुडीत कापसाचा बोळा तर दुसऱ्या नाकपुडीजवळ बासरी धरून हेमंत अगदी लीलया बासरी वाजवतात. त्यांना बासरी वाजवताना पाहणं आणि ऐकणं म्हणजे पर्वणीच आहे.
हेमंत शाळेत असल्यापासून बासरी वाजवतात, बासरी ही तोंडाऐवजी नाकानं वाजवता येऊ शकते का? असा प्रश्न त्यांना शाळेत असताना पडला. त्यांनी प्रयोग म्हणून नाकानं बासरी वाजविण्याचा प्रयत्न केला आणि यात त्यांना यशही आलं. त्यांची ही कला सर्वश्रुत व्हावी, त्यांच्या कलेबद्दल सर्वांच्या मनात आदर निर्माण व्हावा, हेच हेमंत यांचं स्वप्न आहे.