कोचिंग सेंटरला आग, खिडकीतून विद्यार्थ्यांच्या उड्या; वायरला लटकत उतरले; थरकाप उडवणारा VIDEO

दिल्लीमधील (Delhi) मुखर्जी नगरमध्ये (Mukherjee Nagar) एका इमारतीला आग लागली. या इमारतीत अनेक कोचिंग सेंटर्स आहेत. इमारतीत आग लागल्यानंतर सगळीकडे एकच धावपळ सुरु झाली होती. यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या मारल्या.   

शिवराज यादव | Updated: Jun 15, 2023, 01:57 PM IST
कोचिंग सेंटरला आग, खिडकीतून विद्यार्थ्यांच्या उड्या; वायरला लटकत उतरले; थरकाप उडवणारा VIDEO title=

दिल्लीमधील (Delhi) मुखर्जी नगरमध्ये (Mukherjee Nagar) एका इमारतीला आग लागली. ज्ञाना असं या इमारतीचं नाव असून त्यात अनेक कोचिंग सेंटर्स आहेत. इमारतीत आग लागल्यानंतर सगळीकडे एकच धावपळ सुरु झाली होती. यानंतर जीव वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या मारल्या. यामुळे 4 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली युनिव्हर्सिटी परिसराजवळ 12 वाजता आग लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत आग लागल्यानंतर नेमकी किती भयानक स्थित होती हे दिसत आहे. काही विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी खिडकीत लटकत असल्याचं दिसत आहे. तसंच काहींनी यावेळी उडी मारली. तर काहीजण वायरच्या सहाय्याने खाली उतरत होते. 

पोलिसांच्या माहितीनुसार, तिसऱ्या माळ्यावर एका मीटरमध्ये आग लागली होती. आग मोठी नव्हती. मात्र आगीनंतर धूर झाल्याने विद्यार्थी घाबरले आणि त्यांनी इमारतीच्या मागील बाजूने उतरण्यास सुरुवात केली. विद्यार्थी रशी आणि वायरच्या सहाय्याने खाली उतरले. या प्रयत्नात 4 विद्यार्थी जखमी झाले आहेत. 

सर्व विद्यार्थ्यांची सुटका

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, मुखर्जी नगरमधील इमारतीला आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. 11 गाड्या आग विझवण्यासाठी पोहोचल्या होत्या. सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे. कोणताही विद्यार्थी गंभीर जखमी नाही. स्थिती सध्या नियंत्रणात आहे. आग जास्त मोठी नव्हती. आमच्या गाड्या पोहोचण्याआधी काहीजणांनी रशीच्या सहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यामुळे ते जखमी झाले आहेत. 

सूरतमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 20 विद्यार्थ्यांनी गमावला होता जीव

2019 मध्ये सूरच्या सरथाना येथील तक्षशिला कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या एका कोचिंग सेंटरमध्ये आग लागली होती. या आगीत 20 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसंच तितकेच विद्यार्थी जखमी झाले होते.