अल्पवयीन तरुणी कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंग यांना क्लीन चिट, दिल्ली पोलिसांकडून चार्जशीट दाखल

Clean Chit to Brijbhushan Singh: सात महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची (Sexual Assualt) तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते. पहिलं प्रकरण 6 महिला कुस्तीगिरांच्या तक्रारीच्या आधारावर होतं. तर दुसऱ्या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीने तक्रार केली होती.   

शिवराज यादव | Updated: Jun 15, 2023, 07:04 PM IST
अल्पवयीन तरुणी कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंग यांना क्लीन चिट, दिल्ली पोलिसांकडून चार्जशीट दाखल title=

Clean Chit to Brijbhushan Singh: अल्पवयीन महिला कुस्तीपटूचं लैंगिक शोषण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांना क्लीन चिट दिली आहे. दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंग यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या 7 प्रकरणांमध्ये गुरुवारी कोर्टात चार्जशीट दाखल केली. एक चार्जशीट 6 महिला कुस्तीगिरांनी केलेल्या तक्रारीवर आधारित प्रकरणावर आहे. ही चार्जशीट रॉउज अॅव्हेन्यू कोर्टात दाखल करण्यात आली आहे. तर दुसरी चार्जशीट पटियाला कोर्टात एका अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीने केलेल्या आरोपांप्रकरणी बृजभूषण यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. 

21 एप्रिल रोजी 7 महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंग यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांत धाव घेतली होती. यावेळी त्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप करत तक्रार दाखल केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी 28 एप्रिलला दोन तक्रारी दाखल करुन घेतल्या होत्याय. यामधील पहिलं प्रकरण 6 सज्ञान महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीच्या आधारे होतं. तर एका अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीनंतर POSCO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

क्लीन चिट का दिली? दिल्ली पोलिसांनी सांगितलं कारण

दिल्ली पोलिसांनी 550 पानांच्या आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, POSCO च्या तक्रारीसंबंधी कोणताही पुरावा सापडलेला नाही. अशा स्थितीत पोलिसांनी कोर्टात बृजभूषण सिंग यांच्याविरोधातील POSCO अंतर्गत दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणी केली होती. इतकंच नाही तर पोलिसांनी POSCO प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत हे प्रकरण रद्द करण्याची शिफारसही केली आहे. पीडित मुलगी आणि तिच्या वडिलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी कोर्टात हा रिपोर्ट सादर केला आहे.

अल्पवयीन पीडितेने बदलला होता जबाब

बृजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या अल्पवयीन महिला कुस्तीपटूने नंतर आपला जबाब बदलला होता. सुरुवातील पीडितेने बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. नंतर त्यात बदल करत तिने भेदभाव करत असल्याचं म्हटलं होतं. 

अल्पवयीन पीडितेने दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबात लैंगिक शोषणाचा उल्लेख केला होता. पण दुसऱ्या जबाबात तिने लैंगिक शोषणाचा आरोप मागे घेतला होता. तिेने म्हटलं होतं की, "मी फार मेहनत घेऊनही माझी निवड झाली नव्हती. मी तणावात होते. याच रागात मी तक्रार दाखल केली होती".

15 जूनपर्यंत आंदोलन रद्द

विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बरजंग पुनिया यांच्या नेतृत्तात अनेक कुस्तीगीर बृजभूषण सिंग यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. लैंगिक शोषण प्रकरणात त्यांना अटक व्हावी अशी त्यांची मागणी आहे. नुकतंच कुस्तीपटूंनी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली होती. यानंतर मिळालेल्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन 15 जूनपर्यंत रद्द केलं होतं.