INDIA नाव वादात; मोदींविरोधात एकवटलेल्या 26 विरोधी पक्षांवर FIR दाखल

अवघ्या वर्षभरावर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्यात. त्यादृष्टीनं एनडीए विरुद्ध इंडिया अशा दोन्ही बाजूनं रणशिंग फुंकण्यात आलंय. आता प्रत्यक्ष रणमैदानात कोण कुणाच्या बाजूनं लढणार आणि घोडामैदान कोण मारणार, याची उत्सूकता देशातल्या जनतेला आहे.

Updated: Jul 19, 2023, 10:34 PM IST
INDIA नाव वादात; मोदींविरोधात एकवटलेल्या 26 विरोधी पक्षांवर FIR दाखल  title=

I.N.D.I.A. Alliance:  2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एकीकडं सत्ताधारी भाजपनं NDAतल्या जुन्या मित्रपक्षांना साद घातली आहे. तर, दुसरीकडं भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी INDIA नावानं विरोधकांची वज्रमूठ एकवटली आहे. मात्र आता हेत INDIA नाव वादात सापडले आहे. 26 विरोधी पक्षांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. आघाडीला इंडिया नाव दिल्यानं आक्षेप घेण्यात आला आहे.  एम्ब्लेम अ‍ॅक्टचं उल्लंघन केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला. आता तक्रारीवर काय कारवाई होणार याकडे देखील लक्ष लागने आहे. 

INDIA विरोधात दिल्लीच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

26 विरोधी पक्षांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  दिल्लीमधल्या अविनाश मिश्रा यांनी याविरोधात तक्रार दाखल केली. 
दिल्लीतील  बाराखंबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया नाव दिल्यानं एफआयआर दाखव करण्यात आला आहे. इंडिया या शब्दाचा वापर राजकीय फायद्यासाठी करता येत नाही, तसंच INDIA नाव ठेवणं हे एंबलेम अ‍ॅक्टचं उल्लंघन आहे, असं या तक्रारीमध्ये म्हणण्यात आले आहे. 18 जुलै रोजी बंगळुरूमध्ये 26 विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत आघाडीसाठी INDIA अर्थात Indian National Developmental Inclusive Alliance असं नाव निश्चित करण्यात आले आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग वाजायला सुरूवात झाली आहे. सत्ताधारी एनडीए विरुद्ध विरोधकांची 'इंडिया' आघाडी अशी समोरासमोर टक्कर होणार आहे. भाजपला सत्तेवरून हटवण्याची रणनीती आखण्यासाठी बंगळुरूमध्ये गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांच्या जोरबैठका सुरू आहेत. काँग्रेसप्रणित यूपीएचं नामोनिशाण मिटले आहे. त्यामुळं आता इंडिया अर्थात Indian National Developmental Inclusive Alliance च्या झेंड्याखाली विरोधकांची वज्रमूठ भक्कम होत आहे. बंगळुरूतल्या बैठकीला काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, जेडीयू, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट),सीपीएम, सीपीआय, समाजवादी पार्टी, डीएमके, जेएमएम, आम आदमी पार्टी, शिवसेना उद्धव गट, नॅशनल कॉन्फरन्स अशा तब्बल 26 राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.