मेरठ (उत्तर प्रदेश) /
अमरावतीमधून रेल्वेने मेरठला पोहचल्यानंतर त्याला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्याच्या घरातील तब्बल १६ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या ७२ वर्षीय सासऱ्यांचा मृत्यू झाला. मेरठमध्ये हा कोरोनाचा पहिला बळी आहे.
महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये काम करणारी एक ५० वर्षीय व्यक्ती मेरठच्या बुलंदशहरमध्ये सासुरवाडीला गेली होती. त्याला खोकला, ताप आदी त्रास वाटू लागल्यानं त्याची तपासणी करण्यात आली तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं.
अमरावतीवरून आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढल्यानंतर त्याच्या सासुरवाडीतील तीनही घरांमधील सुमारे ५० जणांना अलगीकरण करून ठेवण्यात आलं. त्यांची चाचणी केली असता पत्नी, मेव्हणे, सासरे अशा तब्बल १६ जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं.
२७ मार्चला तो पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर घरातील लोकांना विलगीकरण करून त्यांची तपासणी करण्यात आली होती. दरम्यान, त्याच्या ७२ वर्षीय सासऱ्यांचा मात्र बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला.
धक्कादायक बाब अशी की ज्याच्यामुळे मेरठमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला ती व्यक्ती अमरावतीहून रेल्वेनं मेरठला आली होती. मेरठला आल्यानंतर केवळ कुटुंबीयांमध्येच नव्हे, तर एका लग्न समारंभातही सहभागी झाली होती. शिवाय मशिदीमध्येही गेली होती. त्यामुळे आणखी लोकांना फैलाव झाला असेल का याबाबत प्रशासनानं चौकशी सुरु केली होती. त्याच्या संपर्कात आलेल्या मेरठमधील लोकांना विलगीकरण करून त्यांची तपासणी सुरु केली होती.