अलीगड : दक्षिणपंथी संघटनांनी अलीगडमधील शाळांना ख्रिसमस साजरे न करण्याचे धमकीपर पत्र जाहिर केले आहे.
या पत्रात संघटनांनी चेतावनी दिली आहे की, तर पुढील परिणामांसाठी संपूर्णपणे शाळा जबाबदार असणार आहे. तसे योगी आदित्यनाथ सरकारने सर्व पोलिस प्रमुखांना ख्रिसमस साजरे करणाऱ्यांवर कडक करावाई करण्याचे आदेश दिले आहेत.
हिंदू जागरण मंचाच्या नगराध्यक्ष सोनू सविता यांनी सांगितले की, ख्रिसमस हा पाश्चिमात्य संस्कृतीला प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. म्हणून संघटनांनी सगळ्या शाळांना आणि खास करून मिशनरी शाळांना हे पत्रक पाठवून त्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.
पब्लिक स्कूल डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण अग्रवाल यांनी चिंता व्यक्त केली, ते म्हणाले की, शाळेत सगळ्या धर्माचे सण साजरे केले जातात. या शाळेतील विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक आहेत. तसेच पालक असोसिएशनचे संयोजक अनुराग गुप्ता म्हणाले की, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या धर्माची ओळख करून देण्याची शाळेची मुख्य जबाबदारी आहे. अशातच हिंदू जागरण समितीची धमकी चिंताजनक आहे.
वरिष्ठ पोलीस अधिक्षक राजेश पांडे म्हणाले की, जिल्हा प्रशासन कोणत्याही शाळेला ख्रिमसम रोखण्याची परवानगी देत नाही. सगळ्या शाळांमध्ये ख्रिसमस हा सण साजरा होणार त्यासाठी पूर्ण सुरक्षा उपलब्ध केली जाईल असे आश्वासन दिले आहे.