नवी दिल्ली : एअर इंडियाबाबत एक मोठी बातमी. टाटा सन्सने तोट्यात जाणारी सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची बोली जिंकली आहे. आता टाटा समूह एअर इंडियाचा नवा मालक असेल. मंत्र्यांच्या पॅनलने विमानसेवा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया जानेवारी 2020 मध्येच सुरू करण्यात आली होती, परंतु कोरोना महामारीमुळे त्याला विलंब झाला.
टाटा ग्रुपने 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती, ती सर्वोच्च असल्याने एअर इंडियाची मालकी टाटा ग्रुपकडे देण्यात आली आहे. यामुळे आता तब्बल 68 वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा ग्रुपकडे आली आहे.
एप्रिल 2021 मध्ये सरकारने पुन्हा एकदा पात्र कंपन्यांना बोली लावण्यास सांगितले. 15 सप्टेंबर हा बोली लावण्याचा शेवटचा दिवस होता. वर्ष 2020 मध्येही टाटा समूहाने एअर इंडियाच्या अधिग्रहणाबाबत स्वारस्य पत्र दिलं होते. खरं तर, सरकारने 2017 पासूनच एअर इंडियाचा लिलाव करण्याचे प्रयत्न सुरू केले होते.
पण नंतर कंपन्यांनी यात रस दाखवला नाही. यानंतर, सरकारने एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओएल) चे नियम शिथिल केले, त्यानंतर काही कंपन्यांनी कर्जबाजारी एअर इंडिया खरेदी करण्यास स्वारस्य दाखवलं. नवीन नियमांनुसार, कर्जाच्या तरतुदी शिथिल करण्यात आल्या होत्या जेणेकरून मालकीच्या कंपनीला संपूर्ण कर्ज सहन करावे लागणार नाही.
टाटा समूहाने ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स नावाने विमानसेवा सुरू केली. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय विमानसेवेची गरज भासू लागली. अशा परिस्थितीत, भारत सरकारने एअर इंडियामध्ये 49 टक्के हिस्सा विकत घेतला. यानंतर, 1953 मध्ये, भारत सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि नंतर टाटा समूहाकडून कंपनीतील बहुसंख्य हिस्सा खरेदी केला.