नवी दिल्ली : जगभरातल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या आकड्यांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पण मृत्यू दराचा आकडा बघितला, तर भारत इतर देशांच्या तुलनेत मागे आहे. भारत कोरोना डेथ रेशोमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. १२ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले, तरी भारतातली मृत्यूसंख्या २८ हजार आहे. भारतामध्ये झालेले हे मृत्यू दुर्दैवी असले, तरी हा आकडा जेवढी कल्पना करण्यात आली होती, तेवढा वाईट नाही.
एम्सचे संचालक डॉक्टर रंदीप गुलेरिया यांनी याची काही कारणं सांगितली आहे. कोरोना व्हायरससारख्या साथीच्या आजारांचा भारतीयांनी याआधीही सामना केला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या शरिरात कोरोनाशी लढण्याची ताकद आधीपासूनच आहे.
भारतातल्या एका खासगी प्रयोगशाळेने केलेल्या कोरोना टेस्टच्या आधारावर केलेल्या अभ्यासानुसार भारतातल्या १५ टक्के लोकसंख्येने कोरोनाविरुद्ध इम्युनिटी मिळवली आहे. सिंगापूरमध्येही अशाच प्रकारच्या अभ्यासातून २५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येने कोरोनाविरुद्ध इम्युनिटी मिळवल्याचं समोर आलं होतं. भारतात नागरिकांना टेस्ट झाल्यावरच कोरोना झाल्याचं निदान होत आहे. अन्यथा त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.
पश्चिमेतल्या देशांपेक्षा आशिया खंडात कोरोनाचं कमी धोकादायक रूप समोर आलं आहे, असं डॉक्टर सांगत आहेत. अमेरिकेत रुग्ण आणि मृत्यूंचा आलेख वेगाने वाढत आहे. तर भारतात मृत्यूंचा आकडा आटोक्यात आहे. म्हणजेच भारतात कोरोना व्हायरसचा फैलाव तर झाला आहे, पण हा व्हायरस प्राणघातक नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
भारतामध्ये कोरोना व्हायरसपासून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आज ७ लाख ८२ हजार एवढा आहे, तर ४ लाख ४६ हजार रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. कोरोना रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आपल्याला सावधानता तर बाळगली पाहिजे, पण घाबरण्याचं कारण नाही, असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय.