कोरोनाची लक्षणं नसूनही कोरोना पॉझिटिव्ह?

भारतात कोरोना व्हायरसच्या 80 टक्के रुग्णांना यातील लक्षणं आढळत नाहीत.

Updated: Apr 21, 2020, 10:16 PM IST
कोरोनाची लक्षणं नसूनही कोरोना पॉझिटिव्ह? title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. सर्दी, ताप, सुका खोकला, श्वास घेण्यास त्रास ही कोरोनाची लक्षणं आहेत परंतु नुकतच आयसीएमआर अर्थात भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (ICMR) भारतात कोरोना व्हायरसच्या 80 टक्के रुग्णांना यातील लक्षणं आढळतं नसल्याचं सांगितलं. यामुळे नेमक्या कुणाच्या टेस्ट करायच्या, हा मोठा प्रश्न आहे. 

कोरोनाची लक्षणंच आढळत नसल्यामुळे टेस्ट कुणाच्या करायच्या ही अडचण असल्याचं आयसीएमआरने सांगितलं. ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची टेस्ट करणं, हा यावरचा उपाय आहे, पण सगळ्यांची टेस्ट करणं सोपं नाही.

मॅक्स हेल्थकेअर डॉ. संदीप बुद्धिराजा यांनी सांगितलं की, भारतात आता असे काही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहे की ज्यांच्यात खोकला, सर्दी, तापासारखी कोणतीही लक्षणं आढळतं नाही. ते कोणत्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातही आलेले नाहीत. 

मात्र ही परिस्थिती भारतासाठी चांगली आणि वाईट अशी दोन्ही असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. चांगली कारण, अनेक रुग्ण स्वत:च बरे होत आहेत. ज्याप्रमाणात कोरोना व्हायरस आहे त्याप्रमाणात रुग्णालयात रुग्ण नाहीत. 

वाईट बाब म्हणजे, अशा लोकांमुळे नकळतपणे इतरांना कोरोना संसर्ग होऊ शकतो. नकळतपणे होत असलेला संसर्ग भारतात धोका वाढवू शकतो. त्यामुळे भारताला अधिक लोकांची चाचणी करावी लागू शकते.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाचे रुग्ण आढळलेला परिसर हॉटस्पॉट जाहीर करुन त्या भागात कडक नियम लागू करणं हाच यावरील उपाय आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे घरात राहणं, अत्यावश्यक गरज नसल्यास घराबाहेर न पडणं, सोशल डिस्टंन्सिंग पाळणं हेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचे उपाय आहेत. संपूर्ण जनतेने संयम राखून, सरकारकडून सांगण्यात आलेल्या नियमांचं, सूचनांचं पालन करणं गरजेच असून तरच कोरोनावर मात करता येऊ शकते.