HMPV Virus Outbreak : कोरोनाचं सावट अतिशय धीम्या गतीनं जगावरून दूर होत असतानाच आता एका नव्या विषाणूच्या संसर्गानं साऱ्या जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग गंभीर रुप धारण करत असतानाच कोरोनासम या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी भारतातही आरोग्य यंत्रणा सज्ज होताना दिसत आहेत.
ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) आणि श्वासाशी संबंधित इतर व्याधींशी दोन हात करण्यासाठी नुकतेच दिल्लीतील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इथं. महाराष्ट्रातही सतर्कता बाळगत आरोग्य विभागानं सदर प्रकरणी सावधगिरीची पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे.
चीनमधील कोविडसदृश्य HPMV व्हायरस मुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. घाबरू नका, पण सावध राहा असा सल्ला राज्यातील आरोग्य विभागाच्या वतीनं नागरिकांना देण्यात येत आहे. सोबतच सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचा नियमित सर्वेक्षण करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, राज्यात सर्वांनीच स्वच्छतेच्या नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान दिल्लीमध्ये वैद्यकिय सुविधांच्या संचालकपदी असणाऱ्या डॉ. वंदना बग्गा यांनी या संसर्गासंदर्भात सावधगिरी बाळतच एक बैठक घेतली. ज्यामध्ये रुग्णालयांनी IHIP पोर्टलच्या माध्यमातून इन्फ्लूएंजासारख्या आजारपणांसाठी आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) साठीचे अहवाल तयार करणं अपेक्षित आहे.
इतकंच नव्हे, तर योग्य ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि उपचाराचे निर्देश देत रुग्णालयांना पॅरासिटामोल, एंटीहिस्टामाइन, ब्रोन्कोडायलेटर्स, कफ सिरप आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चीनमध्ये एचएमपीव्ही प्रकोप आणि श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचा अहवाल समोर आल्यानंतर हे निर्देश जारी करण्यात आले.