आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा जागांपैकी 17 जागांवर लढणार आहे. तसंच समाजवादी पक्ष उर्वरित 63 जागा लढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा 2024 मध्ये पराभव करण्याच्या हेतूने झालेल्या इंडिया आघाडीची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच जागावाटपासंबंधी इतकी मोठी घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अखिलेश यादव यांनी चर्चा करा अथवा भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नसल्याचा अल्टिमेटल दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच युतीचा निर्णय दिला आहे.
रायबरेली आणि अमेठी (2019 मध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झालेल्या) या बालेकिल्यांसह काँग्रेस कानपूर नगर, फतेहपूर सिक्री, बसगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी आणि देवरिया येथून उमेदवार उभे करणार आहे. याशिवाय, नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असणारा वाराणसीदेखील देण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी सांगितलं आहे की, "इंडिया महायुतीच्या अंतर्गत लोकशाही आणि राज्यघटनेचा सन्मान राखण्याच्या हेतूने देशातील जबाबदार पक्षांनी काही गोष्टी ठरवल्या होत्या. त्याचंच पुढील पाऊल म्हणून समाजवादी पक्ष आणि काँग्रेस युपीने जागावाटपासंबंधी एक समिती गठीत केली होती. याच्या आधारे सर्व पक्षांना एकत्र घेऊन भाजपाचा सामना करण्यासंबंधी आणि त्यांचा पराभव करण्याचं ठरवण्यात आलं होतं. योग्य समन्वय साधत हा निर्णय घेण्यात आल्याचा आनंद आहे".
पुढे ते म्हणाले की, काँग्रेसने अद्याप या जागांवर कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय घेतलेला नाही. अमेठी आणि रायबरेलीमधील उमेदवारही ठरवण्यात आलेले नाहीत. गांधी कुटुंबासाठी या दोन्ही जागा आपल्या घराप्रमाणे आहेत. ते लवकरच यासंबंधी निर्णय घेणार आहेत. दरम्यान प्रियांका गांधी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल म्हणाले आहेत की, "आपल्या देशातील लोकशाही आणि राज्यघटना दुर्बळ करण्याचा जे प्रयत्न करतील त्यांचा आम्ही सामना करु. लोकसभा निवडणुकीसाठी सध्या कमी वेळ आहे. अशा स्थितीत काँग्रेस आणि सपाने युती केली आहे. याच्या आधारे देशातील वाढती महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी यांचा सामना करु".
समाजवादी पक्ष आपल्या जागांमधील काही जागा प्रादेशिक पक्षांना देण्याची शक्यता आहे. यामध्ये जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाला स्थान मिळणार नाही. समाजवादी पक्षाशी सात जागांचा करार असतानाही त्यांनी मागील महिन्यात भाजपाशी हातमिळवणी केली होती.